कोयता....
या साखरकारखान्यांच्या आवारात दरवर्षी हंगामी गाव जन्म घेतं, पालं थाटली जातात.आपल्या पाठीवरच्या बिऱ्हाडाला घेऊन मजल दरमजल करत मराठवाड्यातून कुटुंबच्या कुटुंबं ऊसतोडणी कामगार म्हणून पश्चिम महाराष्ट्रात येतात...ढवळ्या पवळ्याची जोड घेऊन...
कुणी मुलीच्या लग्नासाठी तर कुणी मुलाच्या शिक्षणासाठी..कुणी शेतीच्या कामासाठी तर कुणी आई बापाच्या दवाखाण्यासाठी कुणा मुकादम किंवा सावकाराकडून उचल घेतलेली असते...ती फेडण्यासाठी आपल्या पाठीवर संसार टाकून निघत असतात...ती घेतलेली उचल हळूहळू कापरा सारखी कधी विरून जाते कळत पण नाही...
आपल्या खांद्यावर आपल्या मालकाच्या पोटाचा टनभर भार पेलत...निसरड्या डांबरी सडकेवर आपल्या खुरानी तो भार जमिनीच्या छातीत रुतवत...तोल सावरत... तरीही पाठीवर असुडाने फटके सहन करत बैलजोड्या किसन वीर सहकारी साखर कारखान्याकडे चालल्या होत्या...दुपारची उन्ह माथ्यावर आल्यानं, सकाळच्या थंडीचा गारवा कमी होऊन सूर्यानं आग ओकायला सुरुवात केली होती...जवळपास एक ते दोन टनांचा भार आणि उन्हाचे चटके सहन करून त्या बैल जोड्यांच्या तोंडाला आलेला फेस तापलेल्या धरणीवर पडून क्षणार्धात वाफ होऊन हवेत गायब होत होता मालकाच्या स्वप्नांगत...!
टनभर ओझ्याच्या वरती मालकाच्या कुटुंबानं आपला धावता संसार मांडला होता...कारभरणीन तयार केलेली भाकर आणि भाजी ते चालता चालता च खात होते...काही गाड्यांवर लहान बाळं सावरत त्यांच्या आया बसल्या होत्या...
पहाटे पहाटे सामान्य माणूस जेंव्हा साखरझोप घेत स्वप्नांच्या कुशीत लोळत असतो, तेंव्हा हा कोयता पोटाची खळगी भरण्यासाठी, आपलं फाटकं नशीब शिवण्यासाठी, कुडकूडणाऱ्या थंडीच्या पेकटात लाथ घालून उठतो,
उसाला आडवं करत करत अख्खा फड गारद करत असतो...कोवळी उन्ह आपल्या चिमुकल्या पावलांनी येत असतात तेंव्हा, त्याचा चिमुकला मात्र तीन उसांच्या तयार केलेल्या झोळीत आपल्या भविष्याची तमा न बाळगता शांत पहुडलेला असतो...तिची घारीसारखी नजर त्या झोळीवर असते...
उघड्या बोडक्या माळाच्या साक्षीनं थाटलेल्या हंगामी संसाराच्या आभाळा एवढ्या झोपडीत तिची स्वप्नं जन्म घेतात...कधी कधी हा उघडा बोडका माळ ही तिच्या लाखमोलच्या अब्रूचा घास घ्यायला टपलेला असतो...म्हणून नवनिर्मितीचं लेणं म्हणजे अख्खं गर्भाशयच तिच्यापासून वेगळं केलं जातं...मग तिच्या अबोल अस्मितेवर झालेले अनेक बलात्कार विरून जातात मग या माळाच्या साक्षीनं....
मात्र कोयता चालतच राहतो...मजल दरमजल करत...
©सागर

No comments:
Post a Comment