गावाकडच्या सांज राती ....
गावातल्या
सांजवेळा खूप सुंदर लावण्यवती...शेळ्या चारायला मधल्या वाटेनं...म्हाळुंग्याच्या
शिवंला जायचो... तेंव्हा एक उंच टेकडाच्या माथ्यावर उभा राहून...समोरचा सूर्य
अस्ताला जाण्याची दृश्य आजही डोळ्यासमोरून हलत नाहीत...अजरणीच्या झाडावर चढून
कुऱ्हाडीने त्याच्या फांद्या तोडून शेरडाना दिल्या की आपल्या नाजूक तोंडाने त्या
ते पाला कुर कुर आवाज करत खाण्यात रमून जायच्या...मी कमरेला गुंडाळलेली
दोरी...हातातली कुऱ्हाड आणि डोक्याचं टॉवेल बाजूला ठेवून एक सपाट दगडावर बसून समोरच्या
दृष्याकडे पाहत बसायचो...
'सूर्य आपला केसरी शेला सावरत हळू हळू हलक्या पावलांनी धरतीच्या
क्षितिजामध्ये अदृश्य होण्याची तयारी करत असायचा......आपल्या लांबसडक किरणांनी
एखाद्या बापाने आपल्या लेकरांकडे ममतेच्या नजरेनं पाहावं,आणि
जाताना जवळ घेऊन लडिवाळपणे पाठी वरून प्रेमाने हात फिरवावा तसा तो जाताना तिथल्या
झाडांवर,गवताच्या पात्यांवर, लाल
मातीच्या कणांवर, मुरमाड जमिनीवर, माझ्यावर
आणि माझ्या शेरडांवर मायेचा हात फिरवत हळूहळू अदृश्य व्हायचा. तो जाताना समोरच्या
गाडीवाटेला आणि केळीच्या बागेला ही विचारून जायचा..मग ती तंद्री समोरच्या
गाडीवाटेवरून जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या कर्कश आवाजाने भंगून जायची...खरच तो प्रसंग
म्हणजे एखाद्या प्रथितयश चित्रकाराने आपल्या कुंचल्यानं कॅनव्हासवर उधळलेल्या
रंगांची एक अपूर्व निर्मिती होती. अशा अनेक सांजवेळा मी अनुभवल्यात. म्हाळुंग्याचा
भोंगा झाला की शेतातल्या कामाची आवारावर व्हायची... दिवसभराची कडक उन्हं जाऊन
अंगावर झेलून आलेला थकवा सांजेच्या थंडगार हवेनं.. कुठल्या कुठे निघून जायचा...पाय
घराच्या ओढीनं तडक निघायचे...डोक्यावर उसाच्या पाल्याचा भारा...हातात शेरडांचा
कासरा...दिवसभरा पायाच्या सेवेनं थकलेली पायताण सुद्धा दमलेली असायची...
सांज आपल्या सोनपावलांनी निघून जायची... हळू
हळू गाव रात्र आपल्या मखमली काळ्याकुट्ट कापसाच्या मऊशार कुशीत घ्यायची... सांजेची
सोनेरी किरणं जाऊन रात्रीची सुरुवात व्हायची...सुरवातीला थकून भागून आल्यावर ....
गावातल्या दुध डेअरीत दुध घालून यायचं...त्यानंतर जिवाभावाच्या मित्रांना भेटत, खुशाली विचारत.... आमची ट्रेन घरी
पोचायची....दिवसभर थकून आल्यामुळ...ताटात जे समोर येईल ते पटकन पोटात ढकललं
जायचं...कोणताही कडवटपणा,किरकिरपणा न करता...
जे काही समोर असायचं त्याची चवच न्यारी
असायची....मग बोजा बिस्तरा घेऊन गावातल्या अंबाबाईच्या मंदिरात झोपायला जाणे...असा
दिनक्रम असायचा... कधी कधी रात्री ऊसाला पाणी द्यायला जावं लागायचं..संध्याकाळी
जेवण करून ...खांद्यावर अंथरून टाकून...पायात गमबूट घालून....हातात मोठ्या फोकसची
बॅटरी घेऊन... आणि काठी घेऊन रानात जायला लागायचं...शेतात सरीनं पाणी लावून ते
तुंबू पर्यंत एका सपाट ठिकाणी मस्त घोंगडी टाकून....आकाशाकडे पाहत पडून राहण्याची
मजा काही औरच.... रात्र पौर्णिमेची असेल तर सौंदर्याचा सोहळाच जणू...आपल्या चंदेरी
प्रकाशाची मुक्त उधळण करत चांदोबा त्याच्या चांदण्यांसह ...एखादा राजा आपल्या
लवाजम्यासह फिरायला निघाला आहे असा भास व्हायचा...त्याच्या प्रकाशात समोरची धरणी
चिंब भिजलेली दिसायची....मधूनच बाजूच्या ऊसातून कोल्ही कुईकुई करत पळायची... सळसळ
झाली की बॅटरीच्या झोतात दात मिचकावून येडवान दाखवायची....आणि पुढच्या सरीत गायब
व्हायची .....
त्यावेळची घोंगडी सुद्धा एक वेगळीच मायेची
ऊब द्यायची... ती घोंगडी नागाव किंवा वाशीच्या धनगरांकडून घेतलेली
असायची....उन्हाळ्यात थंडावा आणि हिवाळ्यात कमालीची ऊब....अशी ती घोंगडी असायची...
पावसाळ्यात जोराच्या पावसात भिजून आल्यावर घोंगडीत शिरून झोपण्याची मजाच काही वेगळी असायची....तिच
कथा आईनं शिवलेल्या वाकळची...उरुसाच्या हंगामात रात्री सोंगी भजनांनी
रंगायच्या...साक्याची सोंगी भजनं अजूनही प्रसिद्ध आहेत....अंबाबाईच्या देवळासमोरचा
चौक गर्दीनं भरून जायचा.....खरंच....गावाकडच्या सांज राती खूप सुंदर
असायच्या....अविस्मरणीय.....


No comments:
Post a Comment