बाप....
भोगावतीच्या कुशीत जन्मलेला माझा बाप...
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर...फक्त ठेचकाळतच राहतोय...
भावंडं आईच्या मायेने सांभाळणारा....आई दादा शेतावर गेले की...मंगल,सुनीता आणि अनिताच्या वेण्या घालून त्यांना शाळेत पाठवणारा...
धाकट्या केरबाला पाठकुळी ला मारून...आजीच्या ओढीनं ठिकपुर्ली च्या मधल्या वाटेनं...तिटवं गाठणारा...
भोगावतीच्या पाण्यात मनसोक्त डुंबणारा...माझा बाप
गावाकडं गेला की....त्या वातावरणात मनसोक्त रमून जातो...आई दादाच्या आठवणीनं हंबरून जुन्या घराकडं बघत डोळं पुसताना कित्येक वेळा पाहिलंय मी...
माझा बाप सहसा कधी रडत नाही....आणि मनातलं दुःख कधीच कुणाला सहसा सांगत नाही....
माहिती नाही कित्येक वेदना आणि संघर्ष ....मनात कैद करून ठेवलेत कुणास ठाऊक....
पेशाने ड्रायव्हर असलेल्या माझ्या बापानं...स्वतःचा संसार उभा करत करत...कित्येकांचे संसार उभा केले...
घाटात नाशिकला वऱ्हाड घेऊन जाताना...समोरचा ट्रक अंगावर येऊन इतरांच्या जीवाला धोका होऊ नये ...म्हणून पन्नास लोकांना वाचवण्यासाठी स्वतःचा पाय पणाला लावणारा माणूस....पायात ब्रेकचा रॉड घुसून बेशुद्ध झाला...मात्र कुणाही व्यक्तीला जरा ही खरचटू दिलं नाही...मात्र त्याच्या पायाच ऑपरेशन ही होऊ शकलं नाही...शेवटी पायाचं हाड एकमेकांवर आपोआपच जोडलं गेलं...
गाडी चालवता येत नाही म्हणून...बाप रडत बसला नाही...हातात डब्बा ,ब्रश घेऊन दुसऱ्यांच्या घरांमध्ये मनसोक्तपणे नटवत राहिला इंद्रधनुष्ये...
त्याही व्यवसायात...तीन अपघातांची मेडल्स घेऊन ...
बाप आजही उभा आहे....त्याच्या आभाळाएव्हढ्या इच्छाशक्ती सोबत...
दुसऱ्यांच्या घरांना रंग देताना कधी..कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय झुल्यावर बसून शंभर शंभर फूट उंच मजल्यांच्या बिल्डिंग रंगवताना पाहिलंय मी...
मी ही दोर सोडलाय तो... शंभर फुटावर बसून....
पोटासाठी जीव धोक्यात घालत...
जिथं तरुण पोरांची झुल्यावर उतरताना हातभार फाटते...
तिथं माझा बाप पोटाच्या ओढीनं ...लिलया उतरतो....
बापाच्या चांगुलपणा चा फायदाच जास्त घेतला जातो...
फसवलं जातं....मग गरीब कामगारांच्या पगाराची भरपाई
माझ्या आईचे दागिने करतात...
बाप "युद्धात जिंकून तहात हरतो"
या व्यवसायावर लोकांनी स्वतःच्या माड्या बांधल्या मात्र बाप मात्र अजूनही भाड्याच्याच घरात राहतो....
भाड्याच्या घरात राहण्याची वेदना त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसते...सल असते चुकलेल्या नियोजनाची आणि चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवल्याची....
आपली स्वप्न आता लेकरांच्या डोळ्यात पेरत राहतो...
मात्र कधीही स्वतःची अपूर्ण स्वप्न आमच्यावर लादत नाही...
आजही खंडे नवमीला शस्त्रे म्हणून बाप ....डब्बा ,ब्रश पूजतो....
वेदना सहन करण्याची क्षमता अफाट आहे....मग ती शारीरिक असो वा मानसिक....
पैशानं माझा बाप जरूर गरीब आहे....
मात्र मनाच्या श्रीमंतीनं तो अंबानीला पण विकत घेईल...
No comments:
Post a Comment