Wednesday, 8 September 2021

 अण्णा...

गावच्या पाटलाकडं जवा चारचाकी न्हवती तवा तू
अशोक लेलँड घेऊन राजासारखा गावात एन्ट्री करायचास...
तुझ्या गाडीनं येवती पाटीवर मारलेला हॉर्न ऐकून ...खोपितल्या दाव्याची मुर्रा म्हैस दावं तोडून तुझ्याकडं धाव घ्यायची...
जीव लावून एखाद्याचं काळीज कसं काबीज करायचं..हे बी तूच शिकवलंय...
कुटल्याबी कामाची कवा लाज बाळगायची न्हाई... कंच बी काम वंगाळ नसतंय...प्रसंगी शेण बी काढायची तयारी असायला पायजे...ही बी शिकवण तुझीच...
जिभवर गूळ ठेवून बोलायचं असतंय...फुडच्याचा मान राखायचा असतोय...हे बी तूच शिकीवलंस...
कोकणापासनं ते कर्नाटकापातूर तुझी गाडी नागिणीसारखी पळायची...
देश कोणचाबी असो...असं कधीच झालं न्हाई की तू माणूस जोडला न्हाईस...
जन्मतःच कपाळावर जातीचा क्रूर शिक्का घेऊन आलेला तू...गावातल्या पाटलांच्या घरात चुलीपर्यन्त हक्कानं वावरणारा अवलिया होतास...
सारा गाव तुला दगडू दादा... न्हाईतर दगडू ड्रायव्हर म्हणायचा...
कोल्हापूर च्या कमानीतून आत प्रवेश केला की...
आजही तू प्रत्येक ठिकाणी भेटत राहतोस...
माझं कोल्हापूरला जाणं म्हणजे प्रत्यक्ष तुझीच भेट होतेय... अस वाटायला लागतं...
कावळा नाक्यावर तुझा भरलेला ट्रक... कर्नाटक किंवा गोव्याच्या दिशेनं जाताना...
क्लिनर ला मारलेली राजेशाही हाक...
आज ही त्या वाटेनं गेल्यावर मला ऐकायला मिळते...
शाहूपुरी,लक्ष्मीपुरी आणि राजारामपुरी आज पण तुझ्या असण्याने गजबजल्यासारख्या वाटतात...
महादबा रोड... पापाची तिकटी...गंगावेश या ठिकाणी तुझा वावर आजही जाणवतो.. जाणवणारच की..
तू माझा पयला जिवलग दोस्तच हुतास...
रंकाळ्याच्या पाण्यासारखा निर्मळ होतास तू...
जोतिबाच्या डोंगराएव्हढा आणि पन्हाळ्याची उंची होती तुझी...
सोनवडे, बांबवडे,कुडीत्रे या गावांच्या वाटा तुझ्या वावरण्याने बहरलेल्या आहेत...तू त्या वाटांना लावलेला जीव... त्या मला लावतात...आजही... तितक्याच मायेने..तुझ्यासारखाच...
दसरा चौकात मला भेटलेलं आईसाहेबांचं देऊळ ...त्या आईसाहेबांची सेवाही केली होतीस मनोभावे...ते देऊंळही आज पावन आहे... तुझ्याचसारखं...
बावड्याच्या चौकात ...गाडी बाजूला घेऊन...
"सदा...आवरलं का न्हाई तुजं....!"
अस म्हणून मारलेली हाक...आजही ऐकायला मिळते मला...माझ्या काळजाच्या स्पंदनांमधून...
डोंगराला जाणाऱ्या एसटी मधून कधी कधी...
हिरवंगार लुगडं नेसलेली...
माथ्यावर भलंमोठं कुंकू ल्याल्याली सोनाई आणि तू... एस.टीतनं डोकावून बघत असल्याचा भास होतो...
कोल्हापूरच्या प्रत्येक चौकात...
तुमच्या आठवणी आज बी एकत्र येऊन झिम्मा फुगडी खेळत्यात..
सोनाई सांगायची..
लहान असताना...पैशाच्या राशीत झोपवलयस मला...
नातू झाला म्हणून तालेवार बारसं घातलं होतंस गावात...
तुझ्या माझ्यासोबत असण्याच्या खुणा...
आजही जाणवत राहतात...
अण्णा तू गेलास...आणि तुझ्यासोबत आमचं वैभव ही गेलं...तुला जाऊन आज तीस वर्षें झाली...
बघ जमलं तर परत ये....
तुझं 'पाडं' तुझी वाट बघतंय...
©सागर सोनाई दगडू
दि.१९ जून २०२०

No comments:

Post a Comment

गुल्या मामा

  गुल्या मामा... माझं लहानपण येवतीला गेला...माझ्या जडणघडणीत या गावाचं खुप मोठं योगदान आहे..हे गाव म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ जणू...माझ्या ...