राजा...
माझ्या सत्तर पिढ्यांच्या फाटक्या आयुष्याला ...
तू तुझ्या मायेची ठिगळं लावून ...हजारो वर्षांचा वनवास संपवलास...
कोंड्याची भाकरी आणि शिळं पाकं जीवन जगून आमचं माणूसपणच नासलं होतं....
पण तू आई बनून आलास आणि आमच्या नासलेल्या माणूसपणाला तुझ्या आभाळाएव्हढ्या हाताने नटवलंस...
मस्तवालपणानं आमच्या उघड्या पाठीवर पडणाऱ्या चाबकाचे आसुड... राजा असूनही तू झेलेलेस स्वतःवर...
ज्याची किमंत तू तुझ्या निर्वाणानंतर...आजही चुकवत आहेस...
राजा तुझं चारित्र्य गंगोत्री पेक्षाही निर्मळ आणि हिमालयापेक्षाही उच्च होतं...फक्त दीन दुबळ्यांचा कैवार घेऊन...उघडी करत राहिलास धर्माच्या कंत्राटदारांची,मक्तेदारांची अट्टल बदमाशी...म्हणून तुझ्या चारित्र्याला आजही बदनाम करतात...'ते'
पण राजा दुःख खूप होत रे ...
जेंव्हा त्या कळपात...तू रक्त आटवून घडवलेली...
तुझीच लेकरं असतात...
राजा...
आज स्वतःच्या सतरा पिढ्यांना पुरेल इतकं ...कमवून ठेवतात इथले...
तथाकथित समाज सुधारक ...राजकारणी...
पण इथं ना जातीचा ,ना नात्याचा असणाऱ्या..
तरुण भीमरावांवर तू...सोपवलीस धुरा...अखंड भारताची...आणि ब्राह्मणेतर चळवळीची... राजकीय वारस म्हणून..
नुसतीच धुरा सोपवून थांबला नाहीस...
भीमराव नावाच्या योध्याला घडवण्यासाठी... छत्र होऊन पाठीशी खंबीरपणे उभा राहिलास...आणि सिद्ध केलेस पुनःश्च... 'छत्रपती' हे नामाभिधान..
मुलांना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना '१' रुपया दंड करणारा तू...
शिक्षणाच्या प्रसारासाठी स्वतःच्या राज्याची तिजोरी मोकळी करणारा तू...
वसतिगृहे स्थापन करून अठरा पगड जाती,बारा बलुत्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करून शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारा तू...आणि शिष्यवृत्ती देऊन अनेक चंद्रमौळी झोपड्यांमध्ये ज्ञानसूर्य आणणारा तू....
राजा आज आमच्या शिष्यवृत्तीत घोटाळे होतात...तेंव्हा तुझी आठवण येते...
खोऱ्याने कचरा भरून टाकावा ...तश्या 'पटा' अभावी मराठी शाळा बंद केल्या जातात...आणि विनाअनुदानित,खाजगी, अभिमत अशा गोंडस नावाखाली...
शिक्षण नावाच्या वाघिणीला...सर्कशीत उभे केले जाते...फक्त मनोरंजन म्हणून...
तेंव्हा तुझी आठवण येते...
'जाती' या मानव समूहाचा नाश करणाऱ्या आहेत...त्या संपवायलाच हव्यात अशी गर्जना करत.. हे नरसिंहा ...
तू तुटून पडलास...आणि बहुनजनांची पिढी निर्माण केलीस...इथल्या जाती आणि वर्णाभिमानी लोकांच्या नाकावर टिच्चून...
आंतरजातीय विवाहाला पाठबळ दिलंस...आपल्याच घरातून..आणि सिद्ध केलेस तू..तुझ्या कर्तेपणाला...
आज जातीच्या मस्तवालपणासाठी कोवळे कोवळे जीव चौकात मारले जातात...आणि त्याला नाव दिलं जातं...'ऑनर किलिंग'
पण राजा मला सांग...
प्रेम करणारे जीव ...क्रूरपणे मारण्यात कुठला आलाय 'ऑनर' ...
अशावेळी तुझ्या राज्यात आंतरजातीय विवाहांना व जोडप्यांना संरक्षण देणारा कायदा केलेला आठवतो...
आणि तुझी आठवण येते...
आरक्षण ही तुझीच निर्मिती...
त्यावर तर आज 'रान पेटवलं जातं'
कालपरवापर्यंत एकमेकांच्या ताटात जेवणारे...
अचानक एकमेकांचे शत्रू होताना...पाहिलेत मी...
इतकं अज्ञान आणि तिरस्कार भरलाय त्या आरक्षणाबद्दल... प्रतिनिधित्वा पेक्षा 'गरिबी हटाव'चा कार्यक्रम झालाय तो सध्या...
तेंव्हा दिवाण सबनीसांना 'आरक्षण म्हणजे काय..' आणि 'ते का असायला हवं..'...हे समजून सांगणारा तुझ्यासारखा समाज शिक्षक दुर्दैवाने आमच्याकडे नाही...
राजा...
गावकुसाबाहेरच्या भटक्या आणि विमुक्तांचा वनवास संपवून... त्यांच्या माथ्यावरचा गुन्हेगारी चा मानवनिर्मित शिक्का पुसून त्यांना माणूस म्हणून पोटाशी धरणारा बुद्धानंतरचा तू पहिलाच राजर्षी...
आज पुरोगामी महाराष्ट्रात कित्येक भटक्या विमुक्तांचे,दलितांचे खून पडतात...
आणि माझा 'पुरोगामी' महाराष्ट्र त्यावर एक शब्दानेही चकार बोलत नाही....
मात्र कुणातरी 'स्टार'साठी...त्याला कंठ फुटतो...
हे पाहून तुझी आठवण आल्याशिवाय राहत नाही...
राजा...
तू अस्पृश्यता दूर करण्यासाठी स्वतःच 'छत्रपती' सिंहासन पणाला लावलंस...
पण ह्या महाराष्ट्राने तुला 'अस्पृश्य' बनवले रे...
मात्र तू आजही आमच्या काळजाचा सिंहासनाधिश्वर आहेस..
राजा ...
तू तालमी गावोगावी बांधल्यास...
इथली पिढी बुद्धी आणि बळाने ताकदवान व्हावी म्हणून..
आज मात्र त्या तरुण पिढीला कुणीही मार्गदर्शक नाही...
विविध रंगांच्या झेंड्याखाली ती विभागली गेली आहे...
तिला तुझ्यासारखाच 'वस्ताद' मिळाला तर ही पिढी सोनं करेल या देशाचं आणि पुन्हा सत्यात आणेल...शिवछत्रपतींचं जात,वर्ग आणि धर्मनिरपेक्ष स्वराज्य....
पण एवढं सांगतो राजा...
माझ्या आणि माझ्या सारख्या अनेकांच्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत...
तुझ्या विचारांची पेरणी आम्ही या महाराष्ट्राच्या मातीत करत राहू...मग त्यासाठी बलिदान द्यावं लागलं तरी बेहत्तर...
बेंबीच्या देठापासून तुझ्या जयकाराची आरोळी देताना ... फुगलेल्या धमन्यांमधल्या रक्तावर ही तुझीच मालकी असते...
बस्स...माझा शब्द न शब्द तुझ्याच कार्याचे पोवाडे गाण्यात खर्ची पडावेत...
एवढीच इच्छा आहे....
दि.२६ जून,२०२०
लोकराजा राजर्षि शाहू छत्रपती महाराज जन्मदिन...
No comments:
Post a Comment