Wednesday, 8 September 2021

 निषेध नोंदवण्यासाठी मेणबत्ती पेटवणार इतक्यात......

मेणबत्ती म्हणाली...
दूर व्हा...तुमच्या हातालापण रक्ताचा वास याय लागलाय मला...!
तुम्ही लोकं...तुम्ही लोकं एखाद्याचा जीव गेल्यावरच कसे काय जागे होता रे...
तुमचा निषेधही सिलेक्टिव्ह असतो रे...
या देशात गाजरागत माणसं कापली जाताना...
एखाद्या आईची कूस पोरकी होताना..
झुंडीनं निष्पाप लोक मारले जाताना...
कुणाही लेकमातीची अब्रू भंडाऱ्यासारखी उधळली जाताना...
तुम्ही मश्गुल असता...
तुमच्याच बिलोरी मखमली विश्वात.....
कारण एकतर हे सगळे एकमेकांच्या जातीचे धर्माचे नसतात...
भुकेने गेलाच एखाद्याचा जीव तर ...
फेसबुक, ट्विटरवर कोरडा शोक व्यक्त करण्यापलीकडे तुम्ही काहीच करत नाही...
बरं तो शोकही बऱ्यापैकी सिलेक्टिव्हच असतो...
जातीय आणि धार्मिक अत्याचार बाजूला सारता..
अगदी....अलगद....कस्पटासमान
काल प्राण्यांच्या मृत्यू वर धाय मोकलून रडणारे तुम्ही...
आज मात्र तोंडात मिठाची गुळणी धरून शांत आहात..
कारण ती वेळ तुमच्यावर आलेलीच नाही...
आज एक माय मात्र हंबरतेय जिवाच्या आकांताने....
तिच्या पोटच्या गोळ्यासाठी...
अशा कित्येक आयांचे हंबरडे... या पुरोगामी महाराष्ट्राने पचवलेत...दारूचे पेग रिचवल्यासारखे...
माणुसकीला फाट्यावर मारून ...
जातीच्या मस्तवालपणासाठी...प्रेमाचे अंकुर ही खुडून टाकले जातात तलवारीने....त्यावेळी...
प्रत्यक्षपणे घाव घालणाऱ्यांपेक्षा... तुम्ही खूप दोषी आहात...
कारण चौकात मानवतेचा मुडदा पडत असताना... तुम्ही मात्र शांतपणे मजा बघत राहता...
अप्रत्यक्षपणे रक्ताचे थेंब तुमच्याही पांढरपेशा खादीवर उडतातच ना...
तुमचा पद्धतशीर सायलेन्स....
अनेक शोषितांवरच्या व्हॉयलेन्सला जन्म देतो...
निषेधासाठी नुसत्या मेणबत्त्या जाळण्यापेक्षा....
त्याच मेणबत्तीने तुमच्यातला हा "व्हाइट सायलेन्स"
जाळून टाका रे....
मानवतेवर अनंत उपकार होतील....
©सागर सोनाई
१३ जून,२०२०

No comments:

Post a Comment

गुल्या मामा

  गुल्या मामा... माझं लहानपण येवतीला गेला...माझ्या जडणघडणीत या गावाचं खुप मोठं योगदान आहे..हे गाव म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ जणू...माझ्या ...