बेंदूर....
मिर्गाचा पयला पाऊस पडला की...शेतातल्या शेवग्याच्या झाडाचा कवळा पाला काडून आणून त्येची भाजी करायची आणि मिर्गाच्या पावसाचं आवतंनं करायचं... मिर्गाचा पाऊस पडला की शेतात तिकाटनं वडून टोकण झाल्याली भाताची रोपं उगवून याची...लाल मातीच्या शेतात कुणीतरी हिरव्या रंगाच्या रेषा मारल्यात का काय...असं वाटायचं... त्यात माझ्या सोनाईची खडूबळी बनवायची घाई असायची..उकडीचं कानवलं बनवायची...
अशात बेंदूर सण यायचा....
आमच्या भागात कर्नाटकी बेंदूर असतोय... यकदा का बेंदूर चार दिसावर आला की...चुये,कावणे, म्हाळुंगे ह्या गावाच्या कुंभारांची लोकं मातीचं बैल घिऊन येवतीला याची..तवर आमी शेतातल्या काळ्या मातीचं बैल तयार करत असायचो...परफेक्ट बैल मला तरी कवा जमला न्हाई...त्येची वशिंड..त्येची शिंगं... यसन...मुसकी...डोळं..शेपूट आसं कायतरी तयार झालेलं असायचं..बैलाचं पाय हत्तीवानी बनिवणारा मी यकटाच हुतो...आता तयार झाल्यालं हे कसलं जनावार हाय...ते 'संदर्भासह स्पष्टीकरण' द्या लागायचं...पण खरं सांगू लय मजा याची...
तसं म्हाळुंगे गावाचं आणि माजं लय जीवाभावाचं नातं...आमच्या धोंडू आईची भईन साऊ आजी ...म्हाळुंग्यात दिल्याली... आमी तिला म्हाळुंगची आजी म्हणायचाव...दिसायला लय देखणी...गोरीपान...काळ्याशार डोळ्याची..हसऱ्या चेहऱ्याची...दातवान लावत असल्यानं ...तिचं दात काळं पडल्यालं...तपकीर लावायची...पण कवा बी येवतीला आली की भाकरीत झुणका न्हाईतर मुगाची उसळ आणायची...त्येची चव कशालाबी यणार न्हाई..
तिथं माज्या हक्काची माणसं... म्हाळुंगचा बेंदूर आणि म्हाई ह्ये आमचे दोन 'राष्ट्रीय सण'...कवाबी गेलं की त्येची शिरमंती ईचारुच नका...हक्कानं दोन दिस मुक्काम ठरल्याला... म्हाई बद्दल जरा नंतर लिवतो... बेंदूर आला की आमची पावलं म्हाळुंग्याकडं वळायची...
म्हाळुंगचा बेंदूर म्हंजे लय शिरमंत सण...त्या गावात आज बी 'कर तोडायचा' शिरस्ता पाळत्यात..मला आठवत न्हाई पण म्हाळुंग्याचं ग्रामदैवत 'श्री चव्हाटा देव' जत्रा ह्याच काळात असतीय का काय...
कर तोडायचा प्रकार म्हंजे बेंदराच्या आधी म्हैनाबर गावातल्या ज्येच्याकड ह्या वर्षी मान यील त्येचा तरणाबांड बैल निवडायचा..त्येला म्हैनाबर कुटलंबी काम लावायचं न्हाई...कणीक, येशेल त्याल, हिरवी वैरण द्याची ..राजागत त्येची उटाठेव करायची...
बेंदराच्या मेन दिवशी...त्येची पूजा करायची...त्येला सजवायचा... आणि गावभर पळवायचा.. त्येला कुटलंबी दावं लावायचं न्हाई...गावाच्या येशीवर सगळ्या गावकऱ्यांनी हुबा रहायचं... त्येला दुसऱ्या गावाच्या हद्दीत जाऊ द्याचा न्हाई...त्यो जर दुसऱ्या हद्दीत गेला आणि त्या गावच्या लोकांनी त्येला धरला तर ह्या गावाचा मान जाईल म्हणून लोकं लय खबरदार असायचीत...गावातल्या तरण्या पोरांचा ह्यो आवडता खेळ... शेवटी त्यो बैल पळवत आणायचा आणि भाताच्या पिंजराचा केल्याला दोर तुटला की 'कर तुटली' म्हणायची...असा ह्यो रिवाज...
हलक्या पावसाचं झिरमाट असायचं...त्यात ह्यो सोहळा म्हंजे डोळ्याचं पारणं फेडणारा असायचा...
मग गावातल्या सजीवल्याला बैलजोड्या घिऊन देवाच्या दर्शनाला याचं असा रिवाज...
आज मी ह्या आनंदाला मुकलोय ...माझी भईन,दाजी आणि त्येंची सगळी लोकं लय जीव लावत्यात... खरं मनात असूनबी आज जाता येत न्हाई...
१९ जून ह्यो आमच्या अण्णांचा स्मृतिदिन....ऐन बेंदरात आमचा वाघ आमाला सोडून गेलता... तवापसन माजी सोनाई बेंदूर कवा करायची न्हाइ...
आज आई ...अण्णा आणि गावाकडचा बेंदूर यांच्या आठवणीनं मन व्याकुळ होत...असं वाटतं पुन्हा माघारी पळत जावं ...भूतकाळात आणि हा सोहळा अनुभवावा आणि आई अण्णांना कडकडून भेटावं...
पण ते शक्य नाही याची जाणीव होऊन मन उदास होत आणि डोळे पुसून पुन्हा मी जगण्याचा तेल घाणा ओढू लागतो...
No comments:
Post a Comment