आमदार आबा....
खूप दिवसांपासून आमच्या आबांवर लिहायची इच्छा होती...करवीर राधानागरीच्या सीमेवर संथ वाहणाऱ्या भोगावती नदीच्या काठावर वसलेल्या हिरवडे खालसा गावात आबांचा जन्म झाला.माझे आजोबा आणि आबा हे चुलत भाऊ...पण बौद्ध वस्ती म्हणजे सगळी आमचीच खानदान...मी आजही गमतीने म्हणतो की आज हिरवडे गावातल्या बौद्ध वस्तीत जर खडा मारला तर तो माझ्या घरातल्या नातेवाईकांनाच लागतो.कारण सगळी वस्ती आमच्याच लोकांची आहे ...जवळपास पस्तीस ते चाळीस उंबरा आमचा...शिवा, तुकाराम,गुंडू,पांडूबा,श्रीपती,यशवंत, कृष्णा या भावांपैकी गुंडू आबा एक...लहानपणापासून या सगळ्या भावांची परिस्थिती गरिबीची होती.बाकीच्या भावांनी शेती करण्यावर भर दिला तर आबांनी थोडी वेगळी वाट धरली...परिते शाहू नगर येथील भोगावती सह.साखर कारखान्याचे संस्थापक दादासाहेब कौलवकार यांच्याशी चांगले संबंध असल्याने ते साखर कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होते...त्याअगोदर त्यांनी एसआरपीएफ मध्ये काम केले होते..मात्र नंतर त्यांनी तो जॉब सोडला...
आबांचा रुबाबच वेगळा असायचा...साठ सत्तर च्या दशकातल्या मराठी चित्रपटांच्या पाटलांचा रुबाब जसा असायचा तसाच आबांचा पेहराव... धोतर,शर्ट,त्यावर कोट,डोक्याला कोल्हापुरी फेटा,पायात कोल्हापुरी पायताण मिशीला पीळ असा पेहराव......स्वभाव फारच बोलका...त्यामुळे अगदी कोल्हापूर पासून ते राधानगरी आणि गारगोटी पासून कागल पर्यंत आबा 'गुंडू आमदार
याच नावाने ओळखले जातात.जुनी पिढी त्यांचा खूप आदर करते.. स्वभाव बोलका असल्याने अगदी अजातशत्रू व्यक्तिमत्त्व....कुणाला न दुखवता राहणे हा महत्वाचा गुण...त्यामुळे या भागात ते प्रसिद्ध...
या भावांनी एकमेकांना कधीच अंतर दिलं नाही...आबा आणि आई कधी येवतीला त्यांच्या बहिणीकडे आले की मला भेटल्याशिवाय जात नसायचे... हिरवडेला जाताना शाळेत यायचे ,शिक्षकांना भेटायचे माझ्या शिक्षणाची विचारपूस करायचे...माझ्या आईला म्हणजे आजीला त्यांनी आक्कासाहेब या नावाशिवाय कधीही हाक मारली नाही..माझ्या आईला ते आजही अक्काताई म्हणतात...
आबा कधीही निवडणुकीला उभा राहिले नाहीत...मात्र बोलक्या स्वभावामुळे लोकांनीच त्यांना 'आमदार' बनवलं...
आज आबा थकलेत... डोळ्यांना अंधुक दिसतं...गुडघ्यांना सूज असल्याने चालता येत नाही...गावी कधीही गेलं तर आजही पाठवरून हात फिरवतात आणि तोंडभरून कौतुक करतात...त्यांचा मोठा भाऊ आणि माझे आजोबा शिवादादा आणि माझी आजी धुरपाआई यांच्या आठवणीने व्याकुळ होऊन डोळे ओले झालेले पाहायला मिळतात...गावाकडे येत चला असे आर्जव करतात...पायाला हात लावला की तोंडभरून आशीर्वाद देतात...
त्यांच्या घरात गेलं की...माझे काका परशुराम सुब्रमनी यांचा डिग्री घेतलेला, त्याच्या विरुद्ध बाजूला दादासाहेब कौलवकरांचा रुबाबदार फोटो,आबांचा पोलीस ड्रेस मधला फोटो...बाबासाहेब आंबेडकरांचे जुने पोट्रेट...पूर्वी एकमेकांना क्रॉस असणाऱ्या दोन फरशी कुऱ्हाडी असायच्या...आता त्या दिसत नाहीत...असे चित्र दिसते...
आज ही कधी गावी गेलं तर आबा त्यांच्या घरच्या अंगणात लोड टाकून बसलेले असतात...आजूबाजूला चार समवयस्क माणसं... 'आमदार पाणी द्या' म्हणून विसवलेला एखादा पाहुणा किंवा वाटसरू असतोच...जुन्या काळातील आठवणींचा खजिना त्यांच्याकडे असतो...
आमचं वैभव आमचे आबा आहेत...त्यांना भेटलं की खूप समृद्ध झाल्यासारखे वाटतं...डेरेदार वडाच्या झाडाच्या सावलीत आल्याचा भास होतो...आमचे आबा म्हणजे चालतं बोलतं लोकविद्यापीठ आहेत...
या फोटोमध्येही तोच रुबाब दिसेल...
प्रा.सागर कांबळे
पुणे.

No comments:
Post a Comment