Wednesday, 8 September 2021

 जिल्हा परिषद शाळा - एक स्वतंत्र विद्यापीठ

सकाळच्या सुंदर वेळी शाळेच्या आवारतल्या चिंचेच्या डेरेदार झाडावर सूर्य आपली सोनेरी किरणं हळुवार उतरवत होता.त्याच्याच रंगाचा पिवळा सोनेरी आणि मातकट रंग मैदानावरच्या मातीला आपल्या कवेत घेत पसरलेला होता...शाळेत एका ओळीत उभी असणारी अशोकाची झाडे परेड ला उभ्या असणाऱ्या सैनिकांसारखी भासली...त्यांच्या हिरव्यागार झावळ्यांमधून शाळेच्या बाजूलाच मोडकळीस आलेली जुन्या शाळेची इमारत लेकुरवाळ्या आईसारखी वाटली.....एव्हाना तिच्या अंगणातील लेकरांच्या किलबिलाटाने घेतलेली जागा आता दुसऱ्या गावच्या लेकरांच्या किलबिलाटाने घेतली होती...तिच्याच बाजूला उभज असणारी सर्व शिक्षण अभियानाच्या फंडिंग मधून बांधून मिळालेली इमारत सवतीसारखी तिच्याकडे नखऱ्याने बघत दिमाखात उभी होती...ती मोडकळीला आली होती खरं मात्र गावातल्या कित्येक पिढ्या तिच्या बेंगलोर कौलांच्या सावलीखाली शिकल्या असतील त्यांची आठवण ती शाळा जपत होती...खरतर जिल्हा परिषद शाळा हे एक स्वतंत्र विद्यापीठ असते...चिमुकल्या पावलांनी पहिलीच्या वर्गात प्रवेश केल्यानंतर ते रडू पाहून कदाचित ती ही गहिवरून गेलेली असेल.पण दगड,विटा आणि माती मुकी असल्याने रडू तरी कशी शकणार...तिला समजून घ्यायला कवीचं काळीज घेऊन जन्माला यावं लागतं. तीच पावलं सातवी पास होऊन हायस्कूल साठी वळतात ना तेंव्हा पहिल्या दिवशी शाळेत गेल्यानंतर आपल्याला शाळेत सोडायला आलेली आई जशी हात हलवत नजरेआड होते ना...!अगदी तशीच ती ही....!
शाळेत असतानाच मातीशी असणारे नाते घट्ट होत जाते.शाळा वर्ग माती,विटा आणि बेंगलोरी खापऱ्यानी बनलेले असतात... मी ज्या शाळेत शिकलो तिथे तर जमीन शेणाने सारवावी लागायची...ते वैभवशाली दिवस आज वाट्याला नाहीत माझ्या...स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळच्या प्रभात फेरीच्या तयारीसाठी आदल्या दिवशी पांढऱ्या शर्टाला निळीत भिजायला घालून वाळल्यावर त्याची व्यवस्थित घडी घालून उशीखाली ठेऊन द्यायचे...मग तोच शर्ट पॅन्ट अंगावर घालून महाराजांसारखे मिरवत प्रभातफेरीमध्ये मिरवत असू...तो राजेशाही थाट पुन्हा मिळणार नाही...
हातावर छडी मारून टम्म हात सुजवणारे गुरुजी जेंव्हा भेटतात तेंव्हा थकलेले असतात...काहींनी इहलोकीची यात्रा संपवलेली असते...पण जेव्हा भेटतात तेंव्हा भरून पावल्यासारखं होतं... त्यांचा थरथरता हात पाठीवरून अलगद फिरतो आणि मग डोळ्यातली गंगोत्री आपला बांध फोडून त्यांच्यां पायाना अश्रूंचा अभिषेक घालते...एवढं झाल्यावर ते म्हणतात, "एवढं भावनिक असू नये...मोठा झालास रे आता...मी रागावल्यावर कोपऱ्यात बसून हुंदके देऊन रडणारा तू अजून बदलला नाहीस..."आणि निघून जातात...
आज शाळेत गेलो की ते दिवस पुन्हा जगावसे वाटतात मात्र कोणतीही किंमत मोजली तर ते दिवस परत येणार नाहीत याची खंत वाटून राहते....
दि.०५ मार्च २०२०

No comments:

Post a Comment

गुल्या मामा

  गुल्या मामा... माझं लहानपण येवतीला गेला...माझ्या जडणघडणीत या गावाचं खुप मोठं योगदान आहे..हे गाव म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ जणू...माझ्या ...