नेल्सन....
बघ..हा पांडुरंग....
तुझ्याच सारखा...
या मातीचा रंग घेऊन...
अवतरला होता ..या भूमीवर...
समतेची व्याख्या यानंच केली होती...
अडीच हजार वर्षांपूर्वी...
त्याला आता अठ्ठावीस युगे उलटून गेली बघ...
त्याच्याच नावानं आज ही पेरणी होते...
पिकांची आणि समतेचीही ... लाखो मनांमध्ये...
पण खरं सांगू... अजूनही...तो बंदिस्त आहे...पुरुष सुक्ताच्या
कुलुपात...आणि पुरोहितांच्या तुरुंगात...
खरंतर तो अजून कुणालाही कळलाच नाही...रे
संतांनी त्याला शोधायचा प्रयत्न केला..
तेंव्हा त्यांना तो सापडला माणसांमध्ये...
नाहीतर इतकी वर्षे... हे वेडे त्याला वेदांमध्येच शोधत होते...
बरं तुलाही तो भेटला असेलच...
दक्षिण आफ्रिकेत...
तुझा सहकारी बनून...
गोरेपणाच्या वर्णद्वेषी खोट्या गृहितकावर...
तुटून पडताना...
स्वातंत्र्याचे अधिकार मागताना...
समतेची आरोळी देताना...
त्वेषाने चालून येणाऱ्यांना शिंगावर घेताना...
समान प्रतिनिधित्वाचा झेंडा घेऊन ...
दक्षिण आफ्रिकेच्या संसदेच्या आवारात...वावरताना...
खरं सांग...तुझ्यासोबत तुरुंगात त्यानं अठ्ठावीस वर्षे घालवलीच ना...अठ्ठावीस युगांसारखी....
तू बाहेर आल्यावर... तुझ्या तत्वांचा विजय झाल्यावर..
तो...पंढरपूरात परतला बघ...
आज तो इथंही...राबतोय ...शेतात....
घामाचं रक्त गाळत...
ओल्या सुक्या दुष्काळात पिकं करपून गेल्यावर...
बँकांच्या,सावकारांच्या दारात उभा राहतो...कर्ज मागण्यासाठी...आपल्याच मुद्दलाचं...
श्रीमंतांची तहान भागवण्यासाठी..त्याच्या चंद्रमौळी संसारावर... मायबाप सरकार नांगर फिरवतं...
मग तो कशाचा असतो...हे तुला नव्याने सांगायची गरज नाही... जे दावं लावून, बेंदराला लाडक्या ढवळ्या पवळ्याची गावांतून मिरवणूक काढली...त्याच दाव्याने तो जवळ करतो...घराजवळची बाभूळ !
त्या बाभळीचा ही श्वास कोंडतो रे...चोखोबासारखाच...
नेल्सन...
सध्या तो एमपीएससी ची परीक्षाही देतोय बर का...
बाभळीवर लटकलेल्या त्याच्याच उपकारांची परतफेड करण्यासाठी... त्याला विनाअनुदानित शाळेवर राबताना ही पाहिलं...पगाराबद्दल बोलताना...म्हणाला...माझं नी रुकमाईचं न्हाई भागत... पण चाललंय...कसंतरी...
त्याला मंत्रालयाच्या दारावर...एकादशीचा उपवास धरून ..मागण्यांचा अर्ज घेऊन ... सोबतीला नामा,तुका ,एका, जना, सखू,निर्मळा,भागू आणि कान्होपात्रा यांना सोबत घेऊन विरोधाचे टाळ वाजवत... घोषणांचे अभंग मोठमोठ्यानं म्हणताना...पाहिलाय मी...
नेल्सन...
नाक्यावर उभा राहून काम शोधताना,
दगड फोडताना,कॉर्पोरेशन च्या पाईपलाईन टाकताना,चर खोदताना, बोअर मारताना, त्याच्या अंगाला लागलेल्या काळ्याकुट्ट बुक्क्याच्या अभिषेकानं तो अजूनच उठून दिसतो...
पण घन, टिकाव उचलताना,कचऱ्याची गाडी जिवाच्या आकांतानं ढकलताना..नाक दाबून ड्रेनेज मध्ये उतरताना...
श्वास कोंडून.. त्याच्या आतड्याला..पडणारा पीळ...माझ्या काळजाला ही पीळ पाडतो...बघ...
बरं सण कोणताही असो...जग तो साजरा करतं ...मात्र हा " ऑन ड्युटी -२४ तास" असतो....चौकात उभा... कमरेवर हात ठेवून...
कधी बहुरुप्याच्या रूपानं भेटतो...तर कधी लालपरीच्या ड्रायव्हर च्या रूपानं...
माझा विठोबा मला भेटत राहतो ...
न चुकता...
त्यादिवशी लिंकनच्या आणि मार्टिनच्या भूमीत गोरेपणाचा दलाल...त्याच्या मानेवर बसून राहिला...तो ओरडत होता..." I can't Breath...!"
पण त्याचं ऐकलंच नाही..तेंव्हा तिथल्या वारकऱ्यांनी थेट तिथल्या हुकूमशाही ला गुडघे टेकायला भाग पाडलं...
ऐक ना...
विठोबा सध्या सुट्टीसाठी...
आषाढीला आलाय म्हणे...
तुला भेटायचं असेल तर मार्टिन आणि अब्राहमला घेऊन आहे तसा माघारी फिर...
आपण समतेची पालखी ....स्वातंत्र्याच्या पंढरपूरला नेऊ...
©प्रा.सागर कांबळे करवीर
आषाढी एकादशी...
१ जुलै,२०२०
No comments:
Post a Comment