माय....
तू अन तात्यांनी हातानं, नसतं पाणी पाजलं तर..
तहानलेल्याच राहिल्या असत्या माझ्या पिढ्यानपिढ्या....
आमच्या उघड्या नागड्या अस्तित्वाला, तुम्हीच नेसवलं मानवतेचं वस्त्र.…
आणि जपली, आमच्या फाटक्या झोपडीच्या कुडाची अब्रू...
तुझ्या अंगावर येऊन पडलेले...
शेण ,दगड, आणि चिखल.... आजही पडतात आमच्यावर...
वेगवेगळी माध्यमं घेऊन...
आम्ही मात्र त्यांना पुरस्काराप्रमाणे ,मिरवतो....
आमच्या स्क्वेअर फुटांच्या छातीवर....मेडल प्रमाणे...
गुलामीला सलामी देऊन…
परंपरेचं ओझ्याचं 'जू' खांद्यावर घेऊन ...आदर्श स्त्री बनण्याची तुझ्या लेकीची चाललेली धडपड पाहून...
तुझ्या विचारांचा पराभव होताना, उघड्या डोळ्यांनी पाहतो..
सांगायचा करतो प्रयत्न, जीवापाड तिला…
समजून ही घेते ती...
पण ही प्रथा,
तिला माणूस म्हणून जगण्याचा हक्कच नाकारते गं...
समजत नाही ग माई....
तुझ्या काही लेकींना नक्की मुक्ती कुणापासून हवीय...
पुरुषांपासून की पुरुष प्रधानतेपासून....
अर्थात आहेत बर त्यालाही अपवाद...
जगावं तिनं ही जरा माणूस म्हणून...
बाईपणाचं ओझं बाजूला ठेऊन...
धुंडाळावी अनंत क्षितिजे....तिच्या अस्तित्वाची...
कोरावीत तिने तिच्या आत्मसन्मानाची लेणी ..
पुरूषप्रधानतेच्या पाषाणात...
म्हणून तिच्यासवे...
तुझ्या सावलीत समतेचा अंकुर पेरून..
मला ही ज्योतिबा व्हायचंय...
No comments:
Post a Comment