Wednesday, 8 September 2021

 तमाम शोषितांच्या भाळावर लिहिलेल्या वेदनांचा एल्गार... तुझ्या लेखणीतून ज्वालामुखी बनून उसळला...अन त्यानं मांडली

मानवतेच्या लढ्याची अभंग गाथा...
तो एल्गार फक्त वेदनांच मांडून थांबला नाही तर...
त्यानं निर्मिती केली एका क्रांतीच्या महाकाव्याची....
आजवर चंद्र,सूर्य, तारांगणे आणि प्रेयसी यांची बिलोरी वर्णन करण्यात ...
इथल्या सारस्वतांच्या लेखण्या झिजल्या...मात्र
आमच्या उपाशी पोटी झोपणाऱ्या चुली त्यांच्या बिलोरी स्वप्नांपासून मैलोनमैल दूर होत्या.....कारण त्यांना त्या मदहोशीत...इथल्या मातीत राबणारी आमची भूक दिसलीच नाही...
तुझ्या लेखणीच्या तोफेतुन निर्मिलेस तू शोषितांचे स्वतंत्र अस्तित्व आणि आकार दिलास आमच्या वेदनांना...
तुझ्या नायिका आणि नायक भलतेच आगाऊ...
प्रस्थापितांच्या बुडाखाली आग लावतात म्हणजे काय....!
चंद्र,सूर्य,तारांगणे,प्रेयसीची मधाळ वर्णने....
यांना खिजगणतीतही न धरता वेदना आणि एल्गार मांडतात म्हणजे काय...!
तुझ्या मैनेची तडफड वैश्विक बनते....
आणि वारणेचा वाघ ही....
फकिरा मध्येच आरोळी देतो अन्यायाविरुद्ध आणि उलथवून टाकतो ही मदमस्त सत्ता...
तू खरंच एक विद्यापीठ होतास...
शोषितांचे विचारपीठ होतास...
तुला बांधता येत नाही कोणत्याही रंगात...
कबीर आणि तुकाराम
लहुजीबुवा आणि ज्योतिबा...
मार्क्स आणि बाबासाहेब ....
या विचारांचं...
परफेक्ट कॉम्बिनेशन आहेस...
"जग बदल घालून घाव
सांगून गेले मला भीमराव " अस म्हणत
सत्यशोधक आंबेडकरी हीच तुझी विश्वात्मक ओळख तू स्वीकारलीस...
म्हणून काळजावर हात ठेवून ....
थोडसं लवुन...
मुजरा करावासा वाटतो तुला...
आणि मनापासून म्हणावं वाटतं....
माझं भाऊ अण्णाभाऊ....
माझं भाऊ अण्णाभाऊ...
१ ऑगस्ट २०१८
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती

No comments:

Post a Comment

गुल्या मामा

  गुल्या मामा... माझं लहानपण येवतीला गेला...माझ्या जडणघडणीत या गावाचं खुप मोठं योगदान आहे..हे गाव म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ जणू...माझ्या ...