Wednesday, 8 September 2021

 सावित्रीमाई...

हजारो वर्षांपासून उजेड...
वरच्या आळीच्या बामनवाड्यात कैद होता...
त्याच्या किल्ल्या होत्या कमरेला....
मनूच्या जानव्याला...
त्यावेळी क्रांतीबानं आणि तू....सरळ सरळ बामनशाहीच्या जानव्याला हात घालत...किल्ल्या हिसकवत...
उजेड मोकळा केला आणि....आमच्या सत्तर पिढीच्या...खोपटात पेरला... आईबापाच्या मायेनं...
खरं सांगू माई...
खोपाट सुद्धा धावून जाऊ लागलं....
इथल्या संस्कृती आणि धर्मव्यवस्थेच्या अंगावर...
हजारो वर्षे गाडल्या गेलेल्या माणूसपणाचा हिशोब मागत...
माई...
आमच्या मुकेपणाला वाचा दिली नसती तर आम्ही कुजत पडलो असतो...आणि वागवत राहिल्या असतो ओझं...
यांच्या माणूसघाण्या तत्वज्ञानाचं...
पण ...त्या तत्वज्ञानाला आता खिंडार पडलंय... आणि आमच्या शब्दांना बळ आलंय ...हजारो हत्तीचं...
ते फक्त तुमच्यामुळे...
तात्या ज्योत होता...तर तू वात...
तुमच्या त्यागाने... उजेड आमच्या वस्त्या वस्त्यांमध्ये ,पाड्या पाड्यांमध्ये, तांड्या तांड्यांमध्ये... पसरला बघ...
त्या उजेडात न्हाऊन निघाल्या...
आमच्या चंद्रमौळी खोपी...
तू अन तात्या आमच्यासाठी जागलेल्या रात्रींचं ..
मुद्दल आम्ही कोणत्या मोलानं फेडावं...
कारण तुझ्या उपकारांचं व्याजच इतकं झालंय की...
मागच्या सत्तर आणि पुढच्या सत्तर पिढ्या ते स्वतःच मोल देऊनही नाहीत ग चुकवू शकत...
तू झेलेलेला शेण,चिखल,दगडांचा मारा...
आजही आमच्या अस्मितेवर ....वारंवार होतो...
आम्ही तो पचवतो....निर्धाराने...
माई..
तुझ्या वावराने पुनीत झालेला...भिडेवाडा शेवटची घटका मोजतोय बघ...
तुझ्या असीम त्यागाने जिच्या गळ्यातलं गुलामीचं लोढणं
दूर झालं... तिच्या तोंडी तुझं नाव सिझनेबल असतं आज काल...तिला अथर्वशीर्ष आणि भजनं गाण्यातच काय तो रस आहे...समोरच्या दगडूशेठकडे वळलेली पावलं ...तुझ्या वाटेकडे वळली असती तर किती बरं झालं असत... समोरच्या दगडूशेठ ला जोडलेले हात भिडेवाड्याकडे जोडले असते तर किती बर झालं असत...
'बाई वाड्यावर या' अस म्हणून तिला खिजवत राहिलेल्या समाजाशी एकनिष्ठ असण्याच्या केविलवाण्या प्रयत्नांत गुरफटून गेलीय...अजगराच्या मिठी सारखी...
म्हणून आता 'बाई फुले वाड्यावर या' अस म्हणायची वेळ आलीय...बघ...
तुझ्या जयंतीचे सोहळे आज देशभरात साजरे होतील...
मात्र तुझा विचार प्राणपणाने पेरणीसाठी आता आयुष्य पणाला लावीन म्हणतो...
©प्रा.सागर कांबळे

No comments:

Post a Comment

गुल्या मामा

  गुल्या मामा... माझं लहानपण येवतीला गेला...माझ्या जडणघडणीत या गावाचं खुप मोठं योगदान आहे..हे गाव म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ जणू...माझ्या ...