Wednesday, 8 September 2021

 मनू....

तुला प्रिय म्हणावं ,असं काहीच नाही.....
पण 'बेट्या' तू बनलायस तरी कोणत्या प्रोटिन्स पासून रे....
माझ्या बापानं तुझी नसबंदी करून ...
नव्वद वर्षांपूर्वीच जाळला तुला...
तरीही आज जिवंत आहेस...आणि तुझ्या हजारो विषारी दातांनी... कुरतडत आहेस...भारतीय समाजमन...
बाईच्या 'बाईपणाचं'
एवढं कसलं तुला भय...म्हणून तिला माणूसपणाच्या संधीच नाकारून घातलीस गुलामीची मखमली बेडी... ज्यातून ती आजही सुटायचा विचार करतेय...पण बेडीलाच अलंकार समजून नाकारतेय मुक्तीचा विचार....
भाऊ...तू जरी विषमतेचा पुतळा असलास तरी...
एक बाबतीत तुला मानायलाच हवं..
तुझ्या वर्णातल्या बायांसह एकजात सर्व बाईजातीलाच ठरवलंस
शूद्र...पण काय करणार तू लादलेल्या गुलामीलाच सलामी देण्यात त्या धन्यता मानत आहेत...
अर्थात अपवाद आहेत बरं का याला....
अशाही काही रणमर्दिनी आहेत ज्या तुझ्या माणूसघाण्या तत्वज्ञानाला फाट्यावर मारून तुझा बाजार उठवत आहेत...सलाम करतो त्यांना...
तीच अवस्था आहे अतिशूद्रांची....
मनू ...
तूच त्यांचा पहिला आणि शेवटचा शत्रू आहेस...
कित्येक वर्षे त्यांच्या गावकुसाबाहेर च्या झोपडीत साधा चंद्र कधी उगवला नाही...मात्र ज्ञानसूर्याच्या उदयाने...पावन केली हजारो वर्षांची गावकुसं आणि निर्मिले लढवय्ये मानवतेच्या लढ्याचे...स्पार्टान सारखे...
आजही त्यांची चंद्रमौळी झोपडी....तुझ्या अमानुष गढ्यांच्या जहागिरीना आव्हान देते आहे...आणि स्वाभिमान पेरत आहे...वाड्यावस्त्यांमधून....तांड्या तांड्या मधून...
ते फक्त आणि फक्त त्या ज्ञानसूर्याच्या प्रखर तेजाने...
त्यांचाच काय तो धाक आहे तुला....!
उच्चवर्णीयांनी स्वतःच्या जातश्रेष्ठत्वाचं डफडं वाजवून फुटेस्तोवर बडवावं इथवर ठीक होतं...
मात्र माझ्या बापानं स्वतःच्या आयुष्याचं मोल देऊन ज्यांच्या गळ्यातलं मडकं आणि फेसाटी जाळून टाकली...
ज्यांच्या अनेक पिढ्या कदाचित कुळ म्हणून राबल्या असत्या खोत आणि कुलकर्ण्याच्या बांधावर आणि हिणवल्या गेल्या असत्या कुणबट म्हणून...
ज्यांच्या हातातल्या कष्टालाही बलुतेदारीचा शाप होता...आणि स्वाभिमान पडला होता गहाण...
मात्र माझ्या बापानं जीवच रान करून या सर्वांच्या गळ्याचं 'दावं'
मोकळं करून मुक्त केलं....तेच आज पुरणातले दाखले देत सिद्ध करू पाहत आहेत...स्वतःच्या फाटक्या चिंध्याचं जातवर्चस्व....
असा कोणता गांजा पाजलास रे यांना...
तू अलगद बाजूला शाबूत राहतोस....तुला जाळायचं सोडून...
ते एकमेकांची घरं जाळण्याची भाषा करत सुटले आहेत..
तू पेरलेल्या विषवल्लीनी अख्खा समाजच नासून गेलाय...
ग्रेट आहेस लेका...
दोष तुला द्यावा वाटत नाही...
कारण तुला आम्ही आमच्या जीवाशी कवटाळून ठेवलाय...
कळत नकळत...
तू दिलेलं जात नावाचं 'मेडल'
छातीला लावून मिरवत असतो आम्ही...
तुझा पुतळा राजस्थान हायकोर्टाच्या आवारात उभा असणं... हा आमच्या भारतीयत्वावर लागलेला मोठा कलंक आहे...
तो कलंक आम्ही आजही घेऊन मिरवत आहोत...भारतीय म्हणून..
दरवर्षी मनुस्मृती जाळली जाते...
मात्र स्मृतीतला मनू...
आम्ही कधी जाळणार आहोत कोणास ठाऊक....
तुला रोखावंच लागणार आहे...
नाही तर तू असाच उगवत राहशील पिढ्या दर पिढ्या...
आणि उध्वस्त करशील मानवतेची सुंदर रचना...
तुला रोखायलाच हवं....
मनुस्मृती दहन दिन
भारतीय स्त्री मुक्ती दिन...

No comments:

Post a Comment

गुल्या मामा

  गुल्या मामा... माझं लहानपण येवतीला गेला...माझ्या जडणघडणीत या गावाचं खुप मोठं योगदान आहे..हे गाव म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ जणू...माझ्या ...