Wednesday, 8 September 2021

 शिवा बावा....

शिवा बावा हे नाव उच्चारलं की आजही हिरवडे गावच्या वेशी थरारतात...त्याचा वचक ,दरारा, माया,आपुलकी जेवढी तेवढीच शोकांतिका ही.. हे व्यक्तिमत्व च वेगळं होतं... इतरांपेक्षा खूप वेगळं...सडोली, हळदी,कांडगाव, देवाळे,राशिवडे,कांचनवाडी,भाटणवाडी,म्हालसवडे,वाशी,पिरवाडी, येवती,कुर्डु या गावांमध्ये मुक्त संचार असायचा त्याचा..दशक्रियेच्या कार्यक्रमात आजकाल लोक कीर्तन ठेवतात मात्र वीस -पंचवीस वर्षांपूर्वी हे बुवा ...कोल्हापुरी भाषेत बावा..भजन म्हणायचे...आयुष्याचे मोल आणि मृत्यूनंतर चे जीवन यावर उपदेशात्मक भजनं गायचे...काही अभंग संतांचे असले तरी जवळपास सर्वच रचना त्यांची स्वतःही असायची आणि कोणतीही पूर्वतयारी न करता...जाग्यावर ती गीतं रचली,गायली आणि एकतारा आणि चिपळ्यांच्या साहाय्याने संगीतबद्ध केली जायची... कदाचित ही खूण असावी आम्ही कबीरपंथी असावे याची..आजच्या संगीतकारानाही लाजवेल अशी रचना असायची...त्यांच्या आवाजात एक असा काही कारुण्यरस असायचा की , मृत्यू पावलेला माणूस कितीही करामती असला ...तरीही या बावांच्या गाण्यातून त्यांची एक सकारात्मक आणि चांगली छबी उभी केली जायची...की ज्याच्या मधून दगडालाही पाझर नाही तर अक्खा दगडच विरघळून जाईल...एकताऱ्याला वीणा म्हणत...
इस्पुर्ली चा भीमा बावा आणि हिरवडेचा शिवबावा हे दोन बावा प्रसिद्ध होते. अंगात भगवी कफनी किंवा विशिष्ट अशा प्रकारचा शर्ट ,लुंगी लावण्याची विशिष्ट पद्धत, हातात वीणा म्हणजे एकतारा आणि चिपळ्या ...त्यासोबत मुखातून अतिशय अवीट गोडीचे अभंग असा सगळा पसारा असायचा...
मी लहान होतो तेंव्हा एक वाळवे किंवा चन्द्रे निश्चित आठवत नाही ...परंतु त्या गावचा एक बावा सकाळी सकाळी भिक्षा मागायला यायचा...स्वच्छ पांढरेशुभ्र कपडे,लुंगीसारखे नसलेले पांढरे धोतर,स्वच्छ विंचरलेले पांढरेशुभ्र केस...अतिशय मंद आणि गोड आवाजात लयबद्ध अभंग गायचा...घरोघरी जाऊन 'श्री गुरुदेव दत्त' अशी हाक देऊन मूठभर तांदूळ घेऊन निघून जायचा... हे बावा विशेषतः महार समुदायातले असत .सूर्याच्या कोवळ्या उन्हात आई देवाला पाणी घालून जास्वंदी च्या झाडाला ते पाणी टाकायला जात असायची. गल्लीत त्याचं आगमन व्हायचं...खूप सुंदर सोहळा असायचा...
हा शिवा बावा ....म्हणजे माझा आजा....एक अवलिया व्यक्तिमत्त्व होतं, अंगावर भगवी कफनी किंवा पांढरा सदरा, रंगीबेरंगी नक्षीची लुंगी,डोक्याला टोपी, मानेपर्यंत रुळणारे केस,पायात प्लास्टिक चा बूट..असा पेहराव..आजा जितका रंगीबेरंगी असायचा तसाच त्याची सायकल ही सजवलेली असायची...हँडलला कॅसेटच्या रीळ पासून बनलेल्या झुरमुळ्या, सीट अगदी कोच सारखी, छोटा दिवा...अशी सायकल...या सायकलने खडीच्या रस्त्यावरून जोरजोरात पळवून त्यानं माझ्या ढुंगणाची सालटं आणि सालटं काढली होती.
कुठेही फिरायचं असेल तरी ती त्याची साथीदार...अर्धा एकर शेतीमध्ये राबायचं... फुरसतीच्या वेळेत भजनं गायची...पावण्यारावळ्यांच्या घरी आस्थेने विचारपूस करायला जाणे असा त्याचा दिनक्रम असे...माझी आजी धुरपा आई खूप देखणी होती...पण तिला कॅन्सर झाल्याने तिचा तोंडाचा भाग कापला होता...त्यामुळे शेवटपर्यंत ती तिचा चेहरा लपवत राहिली...तेरा महिन्यांची वेळ तिला दिली असताना माझ्या वडिलांनी तिला तेरा वर्षे जगवून आपले मातृ ऋण फेडले...यामध्ये स्वतःच सर्वस्व पणाला लावलं...
माझा आजा जात्याच खूप देखणा आणि बंडखोर होता...गावात त्याचा एक वेगळाच दरारा होता...त्याच्या रागापुढे कोणीच उभा राहत नसे....एकदा रागात त्याने गावच्या पाटलाच्या कानाखाली जाळ काढला होता...अक्खा गाव बैलगाडी वापरायचा मात्र माझ्या आजाकडे रेडा गाडी होती....हेम्या आणि शाम्या असे दोन रेडे दावणीला होते...गावातून आजाची रेडागाडी तुफान धावायची....तेंव्हा साक्षात यमराज येतोय का काय? अस वाटून लोक भराभर बाजूला व्हायची....असा माझा आजा....
एकेकाळी सधन आणि संपन्न असणारं घर आजारपण व दारूनं पोखरलं... आजाला दारूचं व्यसन लागलं आणि घराची घडी विसकटली...बहिणींची लग्न झाल्यावर वडिलांनी नि चुलत्यानी गाव सोडलं नि मुंबई गाठली...मोठी आत्या अगोदरच मुंबईला होती.त्यानंतर आजाही मुंबईला आला.मी तीन चार वर्षांचा असेन तेंव्हा त्याने आपल्या पहाडाएव्हढ्या खांद्यावरून मुंबई दर्शन घडवलं होतं.त्याचा स्वभाव हा मानी असल्याने त्याला वावगं पटत नसे. काम करून खाणे हा त्याचा दिनक्रम होता.मुंबईत ही पडेल ते काम केलं त्यानं.मात्र दारू पिऊन धिंगाणा ही तितकाच घातला....मी त्याला एकदा दारू पिऊ नको आजा असं म्हटल्यावर ...सहा महिने त्याने दारूला स्पर्श केला नव्हता.त्याला माझं नातू म्हणून अप्रूप कायमच असायचं...
त्याचं चरित्र फक्त दारूमुळे डागाळलेल...बाकी माणूस म्हणून चांगला होता...माझ्या आईवडिलांना त्याच्या या सवयीचा खूप मानसिक त्रास झाला.मधल्या काळात गावी जाण
माझी दुसरी आत्या खूप देखणी होती.मात्र तिचा आकस्मिक मृत्यू झाला तसेच थोड्या फार दिवसांच्या फरकाने आजीही जग सोडून निघून गेली.त्यानंतर त्याचं एकटेपण अजूनच वाढलं...प्रत्येक मुलाच्या नावे त्याने घरातल्या भांड्यांवर दगड टाकला आणि चेपून विकली....
शेवटच्या काळात त्याने दारूला स्पर्शही केला नाही...वडणगे गावात कुणाच्या तरी घरी सालाने गडी राहिला,मात्र कुणावर अवलंबून राहिला नाही. आणि निघून गेला तो कायमचाच...आम्हाला शेवटचा भेटला पण नाही... जातानाही त्याने कुणावर ओझं ठेवलं नाही...पाठमोराच निघून गेला....
©प्रा.सागर कांबळे करवीर

No comments:

Post a Comment

गुल्या मामा

  गुल्या मामा... माझं लहानपण येवतीला गेला...माझ्या जडणघडणीत या गावाचं खुप मोठं योगदान आहे..हे गाव म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ जणू...माझ्या ...