Wednesday, 8 September 2021

 अवघडलेला बुद्ध...

मित्राच्या बहिणीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी पिंपरी चिंचवडला जायचा योग आला...ते जवळचे नातेवाईक असावेत त्याचे...त्याच्या गरीब नातेवाईकांना पत्रिका देत येत होतो....शेवटची पत्रिका एक प्रतिष्ठित नातेवाईक असणाऱ्या नातेवाईकांकडे जाण्याचा योग आला...त्या अगोदर ज्या ज्या नातेवाईकांना पत्रिका दिल्या ते बिचारे गरीब होते...
या प्रतिष्ठित नातेवाईकांचा पत्ता शोधत शोधत आम्ही पिंपरी मध्ये पोचलो....सोसायटीच्या गेट मधून आत प्रवेश केला...मित्राकडून ते प्रतिष्ठित नातेवाईक पीएचडी झालेले आहेत अस समजलं...थोडं कुतुहुल वाटलं...ऐकून...
पायऱ्या चढून आम्ही त्यांच्या घरी आलो. त्यांच्या दारावर सोनेरी अक्षरात त्यांचं नाव कोरले होते... फ्लॅटची बेल वाजवली....जुन्या जाणत्या माणसांनी दार उघडले...अंगावर नेहरू शर्ट, कमरेला धोतर असा पेहराव...साधारण सहा फुटांचा गोरापान देह...सोबतीला जगण्याच्या संघर्षात बऱ्या वाईट काळात जीवाला जीव देणारी त्यांची जोडीदारीन...त्यांच्यापेक्षा रापलेला चेहरा घेऊन उभा राहिलेली दिसली.. कपाळाला भलं मोठ्ठ कुंकू...अंगावर सोलापूर इरकल..हातात हिरवागार चुडा...गळ्यात डोरलं... पायात चांदीची जोडवी...नववधूला लाजवेल असा साज...आजींचं वय ६५च्या घरात असावं... आणि बाबांचं वय ६७ च्या आसपास....आयुष्यभर काबाडकष्ट करून रापलेला देह.... आता मात्र काहीसा थकलेला दिसत होता..आजोबांनी हमाली करून करून मुलांना शिकवलं...मोठं केलं...तेवढ्याच हिकमतीनं आजीनं त्यांचा संसार पेलला होता...मार्केटयार्डात हमाली करणारं जोडपं गावाकडच्या आभाळाएव्हढ्या घराला सोडून आता आयुष्याच्या संध्याकाळी टोलेजंग इमारतींच्या खुराडेशाही फ्लॅट मध्ये मुलांबरोबर राहत होतं...
आम्ही घरात प्रवेश केला...त्या जोडप्याने आमचं हसत स्वागत केलं...बाजूच्या सोफ्यावर आम्ही बसलो..माझ्या मित्राने जवळचे नातेवाईक असल्याने त्याने त्यांच्या गप्पा मारायला सुरुवात केली...त्यांचं बोलणं चालू असताना माझं लक्ष समोरच्या भिंतीकडे गेलं...समोरच्या भिंतीवर एका नावाजलेल्या संताचा फोटो होता..उजवीकडच्या भिंतीवर महागडा टीव्ही बसवलेला...त्याच्या आजूबाजूला बुक केस...रामायण ,महाभारत, भागवत,दासबोध, भगवत गीता....त्या गर्दीतून कुठेतरी डोकावणारे मनाचे श्लोकही दिसत होते..गणपतीच्या मूर्तीतून येणारा श्री गणेशाय नमः चा अखंड जाप चालू होता...समर्थांच्या मूर्तीने समोरच्या देव्हाऱ्यात आपले स्थान पक्के केले होते...त्यांच्या आजूबाजूला देवाचे अनेक अवतार जणू पहाराच देत होते की काय कुणास ठाऊक... हे सगळं ठीक आहे...माझं मन खूप अस्वस्थ झाला...माझी नजर ज्याला शोधत होती तो कुठे होता...?
या सगळ्यांच्या गर्दीत तो मला दिसला...सर्वात टॉप ला ...
काहीसा एकटा...डोळे झाकून
बसलेला...अवघडलेला ...बुद्ध.....!
©सागर सोनाई

No comments:

Post a Comment

गुल्या मामा

  गुल्या मामा... माझं लहानपण येवतीला गेला...माझ्या जडणघडणीत या गावाचं खुप मोठं योगदान आहे..हे गाव म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ जणू...माझ्या ...