तुकोबा...
ही माणसं येतात तरी कुठून रे...
कुठून मिळते यांना...मैलोनमैल चालायची दुर्दम्य इच्छा...
कोण देतं निमंत्रण....कोण ओढून आणतं त्यांना काळ्या इटू चं दर्शन घ्यायला...
तुकोबा...
या माणसांचं आणि माझं जन्मजन्मांतरीचं नातं आहे ...जसं तुझं नि माझं...
खांद्यावर घेतलेली मातकट भगवी पताका...आणि कपाळाला लावलेला काळा बुक्का...इथल्या काळ्या आणि तांबड्या मातीचाच प्रतिनिधी...
चालताना त्यांच्या पायाचं संगीत जुळत होतं माझ्या हृदयाच्या स्पंदनांशी...
तुकोबा...
ही माणसं भेटतात रे दरवर्षी...सर्व काही सोडून जावं वाटत त्यांच्यासोबत चालत काळ्या इट्या च्या दर्शनाला...
कारण त्याच्या काळ्यापणात ही माझ्या तथागताची चिरशांती दडलीय बघ...
तुला भंडाऱ्याच्या डोंगरातल्या लेणीत भेटलेली मनःशांती......क्षणभर...
तुकोबा तुझ्या बुडवल्या गेलेल्या गाथा आज ही मला भेटतात यांच्या रुपानं...
पण खरं सांगू तुकोबा...
तुझा विद्रोह मला नाही भेटत....
तुझा विद्रोह मला नाही भेटत...
No comments:
Post a Comment