ती नऊ दहा वर्षांची असावी...उन्हांत रापलेल्या काळ्या माई सारखीच...अंगात नावापुरता अडकवलेला जुना मळका टॉप...तो ही कदाचित कुणी तरी दिलेला असावा...थोडी बुजरी...चार पाच दिवस अंगाला पाणी नाही...केस वाढले तर कापायला ही पैसे नसावेत कदाचित त्यामुळं ठेवलेला प्लेन बॉय कट...दुकानात काही तरी सामान न्यायला आली होती.पायात तुटलेली चप्पल..तिलाही तारेने बांधलेली...काखेत मोठी पिशवी...
आमच्या घरापासून थोड्या दूर अंतरावर पडलेल्या भटक्या विमुक्तांच्या पालावरची ती लेक...मन विचारमग्न झालं..मोकळ्या आकाशाखाली चार गोधड्यांची पालं टाकून जगण्याची लढाई लढणाऱ्या परिघाबाहेर असणाऱ्या परंतु समाजानं गणती न केलेल्या माणसांची ही वस्ती...ना गाव, ना कागदपत्रे ना ओळख... गोऱ्या इंग्रज सरकारने लादलेला अमानुष शिरस्ता स्वतंत्र भारतात ही आपल्या ढोंगी समाजाने इमानेइतबारे जपला..
ती ही त्याच व्यवस्थेची बळी....कधी कधी तिची भावंडं खेळत असतात आजूबाजूला...त्यांच्या झोपडया रंगीबेरंगी गोधड्या पसरून छप्पर तयार केलेली असतात...पाण्यासाठी प्लास्टिक च्या घागरी घेऊन पळणारी ती... आईबाप पोटाच्या ओढीनं गावात फिरून चिल्यापिल्यांसाठी काही तरी कमवून आणावं या विचारानं सकाळी लवकरच घर सोडून सुया,बिबं,कानकोरणं, हातातली कडी, इ.विकायला मैलांची पायपीट करणार...आणि आपल्या लेकरांना संध्याकाळी मायेचा घास भरवणार... घरातल्या लहानग्यांसाठी 'तीच' आई आणि बाप ...घराजवळच्या काकांच्या दुकानातून दोन रुपयांचं काही तरी खायला आणायला भावाला आणि बहिणीला घेऊन जाणार...त्यापैकी एखाद्यानं तिच्या हातातलं मागितलं की ती तोंड वाकडं करणार...मग ते लेकरू उभ्या रस्त्यावर आडवं पडून रडायलाच लागणार ...त्यावेळी मन मारून नाईलाजाने आपल्या हातातली खाण्याची वस्तू भाऊ किंवा बहिणीला देऊन टाकणार...अशी ती...
शिक्षण घेणं तर लांबच...लहानगी भावंडं सांभाळण्यासाठीच तीच कोवळं बालपण पणाला लागलेलं... रोज येताना ती दिसायची...कधी काखेत घागर घेऊन,कधी रडणारी भावंडं आईच्या मागं लागून जाण्यासाठी आकांडतांडव करत अख्ख्या रस्त्यावर लोळताना सावरताना...संध्याकाळी पिऊन आलेला बाप आईला शिव्या देताना, मारताना आपल्या भावंडांना आपल्या पंखाखाली घेऊन झोपडीच्या एका कोपऱ्यात निपचित बसणारी...प्लॉटिंग पडलेल्या काळ्या आईच्या कुशीत मिसळून जाऊन खेळणारी...कधी मातीच्याच भाकरी बनवणारी...कधी तीन दगडांची चूल तयार करून जेवण करणारी....पानांची भाजी करणारी...बुधल्यात पाणी आणून देणारी...आईबापाच्या फाटक्या संसारात सर्वांची माय बनून वावरणारी ती...!
पीएचडी च्या कामानिमित्त पुण्याच्या बाहेर जावं लागलं ...मुक्काम सलग तीन दिवस बाहेर होता..चौथ्या दिवशी पहाटे घरी पोचलो.सूर्य उगवत होता...त्यानं आपल्या आभाळाएव्हढ्या हातांनी आक्खा परिसर आपल्या पंखांखाली घेतला होता...घराच्या ओढीनं मी आणि माझी बाईक दोघेही धावत होतो...घराजवळ येताच माझं लक्ष त्यांच्या वस्तीकडे गेलं...त्या लोकांनी आपली वस्ती दुसरीकडे हलवली होती...कोण होते ,कुठून आले होते,कुठे गेले...या विचारानं मन व्यथित झालं..'ती'चा चेहरा माझ्या नजरेसमोरून हलत नव्हता...
आता त्या ठिकाणी फक्त उघडी पडलेली जमीन....त्यांच्या बैलगाड्यांच्या चाकांच्या खुणा...आणि तिचा तो खोटा खोटा संसार आणि तीन दगडांची चूल दिसत होती...
No comments:
Post a Comment