तात्या...
शब्दबंबाळ होणं सोडून दिलंय आता ...
तुझ्यासारखं नाही जमलं ...काम करायला...
माणसाच्या मुक्तीचा ध्यास घेऊन...लढायला...
उगाच शिकलो अस वाटतंय...
शिक्षणाने माणूसपण येतं अस आजी म्हणायची माझी...
ती चुकीची नव्हती...
तिच्यासमोर क्रांतिसूर्याचं उदाहरण होतं...
आता आजी ही नाही आणि क्रांतिसूर्य ही...हयात..
त्याच्या नावाने जोगवा मागणाऱ्या परड्या घेऊन जोगत्यांची पिढी मात्र इमानेइतबारे आपलं काम चोखपणे बजावताना दिसतेय...
शिक्षणाचा उपयोग पॉट भरण्यासाठी न होता समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत झाला पाहिजे...हा रोमँटिझम घेऊन शिकत गेलो...
मात्र शिक्षण घेऊन बामनवाड्यातल्या पोथ्यांसारखी ...
सर्टिफिकेट घेऊन...'माझीच लाल' म्हणत मिरवणाऱ्या
तुझ्याच उपकारांच्या तुकड्यावर जगणाऱ्या स्वयंघोषित विद्वानांच्या झुंडीत अडकून गेलोय बघ...
इथं प्रत्येकाला 'महात्मा'व्हायची घाई झालीय...असो...
समतेचा...न्यायाचा अर्थ काय तुझ्याकडूनच समजून घ्यावा...जसा शाहू आणि आंबेडकरांनी समजून घेतला...
लेकरांची काय चूक...
त्यांना तुझा विचार समजून घ्यायला आम्हीच कमी पडलो
एकजात करंटे साले...
बामणी विचार आणि प्रतीकं रुजली तात्या...
स्लो पॉयझन सारखी...त्यालाच मिरवण्यात हयात गेली...आमची
तुझं अँटी बायोटिक द्यायला ...कमी पडलो....मान्य करतो...
प्रतिक्रांतीचं वादळ घोंगावत असताना..
काळझोपेत बहुजन समाज गाढ झोपेत असताना...
विद्रोहाचा आवाज निर्घृणपणे दाबला जात असताना...
तात्या तुझी अन साऊ माईची लय आठवण येतेय बघ...
©प्रा.सागर कांबळे करवीर
No comments:
Post a Comment