त्यांनी बोटीवरून समुद्रात मारलेली उडी त्रिखंडात गाजली....मात्र...
वजनदार साखळदंडानी करकचून बांधले असतानाही...
रांगड्या कृष्णामाईच्या तुफानी डोहात तुम्ही मारलेली उडी ... नाना....इथला इतिहास लिहणाऱ्यांनी...
जाणीवपूर्वक नजरेआड केली...आणि तुमच्या वाट्याला आलं इतिहासाच्या पुस्तकाचं ....अवघं अर्धं पान....
देश स्वतंत्र व्हायच्या अगोदरच तुम्ही लावली होती पताका विजयाची...
ठोकून काढली होती इथली काळी आणि गोरी माजोरी सत्ता...
आणि पेरली होतीत शिवशाही या शिवारा शिवारात.....
कर्मवीरांच्या आणि कर्मयोगी गाडगेबाबांच्या ओटीत रयत वाचवण्यासाठी तुम्ही टाकलेली लक्ष्मी पाहून आणि धडपड आठवुन आज शिक्षणाचा बाजार मांडला जात असताना... तुमची आठवण होते...
तुमच्यातला सत्यशोधक दूर सारून तुमची कम्युनिस्ट एवढीच काय ती ओळख दाखवली इथल्या फुलणाऱ्या कोवळ्या पिढीला....कारण सत्यशोधकच खरे असतात लढवय्ये आणि त्यांचा जन्म होतो फुले आणि शाहू विचारांच्या समृद्ध गर्भातून.. हा इतिहास पुसायचा होता त्यांना...
म्हणून तुमचं कार्य कर्तृत्व इथल्या कलम कसायांनी बंदिस्त करायचा प्रयत्न केला...
पण नाना....
तुमच्या सुर्यासारख्या तळपणाऱ्या कर्तृत्वाने इथला सह्याद्रीचा चिरा न चिरा पावन झालाय...
कृष्णामाई, कोयना माई...तुमच्या गौरवाच्या गाथा आज ही गातात....
शिवरातली पाखरं आज ही सांगत सुटतात तुमच्या आठवणींची कृष्णाकाठी महाकाव्ये...
नाना...
आयुष्याच्या संध्याकाळी एवढे शांत का झालात...
नाना बोला...
पुन्हा एकदा घुमू दे...
तुमची ती गर्जना...आणि गर्जून जाऊ दे सह्याद्रीचा कडा न कडा...
हादरून जाऊ दे आजच्या सुलतानी गढ्यांचे पोलादी तख्त....
अन चौफेर उधळू दे तुफान सेनेची अश्वं
पुन्हा पावन होउ दे...
कृष्णा,वेण्णा, आणि कोयनामाईची कूस...
तुमचं शांत राहणं....आता सहन नाही होत...
© सागर सोनाई
३ ऑगस्ट,२०२०
क्रांतिसिंह नाना पाटील जयंती..
No comments:
Post a Comment