Thursday, 27 July 2023

रमाईचं प्रेम...!

 रमाईचं प्रेम

"रामू....तू हवा पालटसाठी... बेळगावला जाऊन ये काही दिवस....लक्ष्मी वहिनी असतील तुझ्यासोबत...बळवंतरावना मी बोललोय....तू तयारीला लाग बरं...."
"साहेब मी कुठं पण जाणार नाही...मी इथं नसले की तुम्ही स्वतःची नीट काळजी घेत नाहीत...सतत त्या पुस्तकांमध्ये गढून जाता...वेळेवर जेवण करत नाही तुम्ही....मी कुठेही जाणार नाही" रमाई तक्रार करत होती..
बाबासाहेब रमाईला हवापालटासाठी बेळगावला जायला सांगत होते आणि रमाई बाबांच्या काळजीपोटी जायला तयार होत नव्हती...तिच्या डोळ्यात तिच्या "साहेबांबद्दल" अतीव काळजी दाटली होती... शेवटी बाबासाहेबांच्या शब्दाचा मान राखून रमाई बेळगावला जायला तयार झाली....
बाबासाहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते बळवंतराव वराळे एक वसतिगृह चालवत...जवळपास तीस ते चाळीस मुलं त्या वसतिगृहात राहत असत...
रमाई बेळगावला आली...पहिले दोन दिवस खूप आनंदात गेले...
तिसऱ्या दिवशी मात्र तिच्या नजरेतून बळवंतरावांची होणारी तगमग सुटली नाही...बळवंतराव कोणत्या तरी विचाराने त्रस्त होते...
रमाईच्या लक्षात आलं की, बळवंतराव काही तरी लपवतायेत...
आणि इकडे बळवंतराव आईसाहेबांना कसं सांगायचं..?
या विवंचनेत होते...
शेवटी त्यांची चलबिचल ओळखून रमाई त्यांना म्हणाली....
"दादा, मला आपलं वसतिगृह पाहायचं होत, मुलांना भेटायचं होतं..."
बळवंतरावांच्या लक्षात आलं की ,आईसाहेबांना आपली चिंता कळली आहे...
त्यांच्या डोळ्यात पाणी आलं...गहिवरल्या स्वरात ते रमाईला म्हणाले...
"आईसाहेब, वसतिगृहातली मुलं आज उपाशी आहेत...आज सणाचा दिवस...त्यांच्या पोटात काहीच नाही...वाण्याचं बिल थकलाय... त्यानं सामान द्यायला नकार दिला...मी खूप प्रयत्न केले पण...काहीच नाही करू शकलो..."😓
रमाईने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या हातातल्या सोन्याच्या पाटल्या काढल्या...गळ्यातली सोन्याची पोत काढली...आणि पटकन बळवंतरावांच्या हातात ठेवले...आणि म्हणाली...
"दादा ,हे दागिने घ्या .. सोनाराकडे गहानवत ठेवा ...आणि सामान भरा...दागिने नंतर सोडवता येतील..मी माझ्या लेकरांना आज स्वतःच्या हातानं खाऊ घालणार आहे..."
बळवंतराव रमाईच्या या शब्दांनी गहिवरले...
"आईसाहेब, बाबासाहेबांनी तुमच्यासाठी हौसेनं केलेले दागिने मी कसे बरं गहाण ठेऊ...होईल काही तरी सोय... हे दागिने ठेवा तुम्ही.."
"दादा, माझी लेकरं उपाशी असताना, मला कसा चैन पडेल बर..." रमाई बोलली...
मोठ्या जड अंतःकरणाने बळवंतरावांनी ते दागिने घेतले...सोनाराकडे गहाण ठेवले आणि सामान भरले...
त्यादिवशी रमाईनं स्वतःच्या हातानं स्वयंपाक केला...गोड जेवण बनवलं..मुलांना आपल्या हातानं खाऊ घातलं...
बळवंतरावांनी ही गोष्ट जेंव्हा बाबासाहेबांच्या कानावर घातली तेंव्हा...बाबासाहेबांना रमाईचा खूप अभिमान वाटला...
अशी होती रमाई....
तिची माया.. तिच्या लाखों करोडो पिलांवर आजही पाखर घालते...
तिचं ऋण...आमच्या लाखो पिढ्यांनी, जरी फेडायचे प्रयत्न केले तरी तिच्या ऋणातून कधीच मुक्त होऊ नाही शकत...
तिचा त्याग...त्याची तुलना फक्त आणि फक्त यशोधरेच्या त्यागाशीच करता येईल...
तिनं सहन केलेलं दुःख...वेदना...अपमान...त्रास...कष्ट...
यासाठी शब्दच नाहीत.....तिथं शब्द मुके होतात....
आई ...वाढदिवसाच्या आभाळभरूनशुभेच्छा....!

No comments:

Post a Comment

गुल्या मामा

  गुल्या मामा... माझं लहानपण येवतीला गेला...माझ्या जडणघडणीत या गावाचं खुप मोठं योगदान आहे..हे गाव म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ जणू...माझ्या ...