राजा शिवबानं साडे तीनशे वर्षांपूर्वी...
लेकरं म्हणून आम्हाला पोटाशी धरलं..
गुलामीच्या बेड्या तोडून पराक्रमाचं
शेर भर सोनं हातात सारलं...
उपाशी पोटी फिरणारा समाज
स्वराज्य टिकावं म्हणून...
जीवाचं दान देऊ लागला...
शंभुराजानं देखील तसाच
आमचा माय होऊन सांभाळ केला...
त्याच्या हत्येचा बदला आम्ही
भीमा कोरेगाव ला घेतला..
त्यानंतर आम्हाला वालीच न्हवत कुणी...
माणूस असून आमची मुकी झालती वाणी
पेशवाईचा सूर्य नुसताच बेईमान होता...
महार मांगवाडा सोडून नुसता...
बामन आळी वर उगवत होता..
ज्या हातात तलवार शिवबानं दिली होती..
त्याच गळ्यात मडकं आणि
पाठीला फेसाटी आली होती..
पेशवाईचा आग ओकणारा सूर्य
भीमा नदीत अस्तंगत केला...
आणि कुणी इंग्रजानं न्हव्हे तर बाळाजी पंत नातूने
युनियन जॅक लावला..
शासक बदलला तरी आमची स्थिती तीच होती
इंग्रजी सत्ता सामाजिक स्थितीला
हात लावायला भीत होती
तो ही सूर्य बामनवाड्याच्या आळीवर
प्रकाश देत होता...इमानेइतबारे...
मालक बदलला तरी ...सामाजिक नियम तोच होता...
काळ्याकुट्ट रात्रीला फाडून...
जोतीबा सवित्री मायबापानं
आम्हाला पुन्हा माणसात आणलं
शिक्षणाचं पाणी स्वतःच्या हाताने पाजून
बामनशाहीच तोंड आसूडानं हाणलं
जोतिबा सावित्रीनं पेरलेला मानवतावाद
तू वेदोक्तच्या उरावर थयथया नाचत
जिवंत ठेवलास...
शिक्षण आणि आरक्षण ही आयुधं
तूच आमच्या भात्यात पेरलीस
पोटाला अन्न आणि हाताला काम
तुझ्याच मेहेरबानीने मिळालंय हे कस विसरू सांग
तूच पालक आणि तूच वाली झालास
दीन दुबळ्या लेकरांचा...
आई बाप होईन तूच पुन्हा पोटाशी धरलंस
जसं शिवबानं आम्हाला धरलं होतं... आम्हाला पोटाशी...
माझ्या बापाच्या डोक्यावर स्वतःचा फेटा ठेवून
अखंड भारताचा पुढारी म्हणून
जणू राज्याभिषेक च केलास
माझ्या बापानं संविधान लिहिलं
त्यात शिवबा, जोतिबा, साऊमाय, आणि तू
पानोपानी भेटत राहतोस...
राजा...
वरच्या बामनाआळीत इमाने इतबारे चाकरी करणारा सूर्य
कासरा लावून तू महार मांगवाड्यात ओढून आणलास
किती हे थोरपण तुझं...
या देशात पुन्हा मनू डोकं वर काढत असताना
त्याच्या मुसक्या आवळणाऱ्या
कसलेल्या तुझ्यासारख्या वस्तादाची गरज आहे बघ...
या देशाला...
तुला तुझ्या वाढदिवसाच्या आभाळ भरून शुभेच्छा...
प्रा.सागर मा.कांबळे

No comments:
Post a Comment