शिवबा....
राजं मुजरा...
तुमच्या मावळ्याचा कुर्निसात कबुल करा...
तुमची आज जयंती...
तुमच्या बद्दल काय लिहावं आणि किती लिहावं...शब्दच कमी पडतात...
राजं...
तुम्हाला आजकाल देव म्हणण्यापेक्षा ...हाडामासाचा माणूस म्हटलं की जरा तुमच्या अधिक जवळ येतो....
मग तुमचं लेकरु बनून प्रेम करतो...
तुमच्या पायापाशी बसून माँसाहेब, महाराजसाहेब,यांच्या मोठेपणाच्या, दातृत्वाच्या ,मातृत्वाच्या कथा ऐकता येतात...
तुमच्या हातातली तलवार मग लेखणी म्हणून कधी जन्म घेते...
कळतच नाही...
तुटून पडते मग ढोंगी व्यवस्थेवर....
राजं...
तुमचं नाव मुखात आलं...
की जयजयकाराबरोबर जबाबदारी ही वाढते बरं...
तुमची स्टाईल जरा कॉपी करावी वाटते...
मग जाणीव होते की....
तुमच्या स्टाईलची कॉपी करणं सोप्प आहे...
पण तुमच्या कर्तृत्वाची,तुमच्या संकल्पाची कॉपी करायला वाघाचं काळीज हवं...
कारण सोंगी माणसांची कामं नव्हेत ती...
आजवर तुमच्या तोरणांवर चर्चा करणारे तथाकथित 'शिवशाहीर' चौकाचौकात उभा राहून सांगतात...
तुमचं चरित्र....रंगवून...
मात्र तुमचं माणूसपण मात्र ठेवतात लपवून....शातीर पणे...
आणि घेतात बरं बिदागी... सरकार दरबारची....
तुमच्या धोरणांवर चर्चा करणारे... तुमच्या माणुसपणाचे पोवाडे गाणारे...शिवराय 'तोडण्याचं' नव्हे तर 'जोडण्याचं' माध्यम आहेत...हे पोट तिडकीने ओरडून सांगणारे 'कॉम्रेड' मात्र चौकात गोळी घालून मारले जातात..
राजं...
आज आठ महिन्यांच्या लेकीही सुरक्षित नाहीत हो...
तिथं मोठ्या मायभगिनींची काय कथा...
तिच्या अब्रूची लक्तरं ओरबडायला...
टपलेली असतात ही जनावरं...
त्यावेळी ते विसरतात... ती कुणाची तरी असते...आई, बहीण , लेक असते....
पर स्त्री मातेसमान मानण्याची तुमची शिकवण...
कसं काय विसरला हा समाज कुणास ठाऊक....
राजं...
तुमच्यासारखं दिसण्याचा आटापिटा करताना ...
अनेक जण दिसतात...
मात्र तुमच्या पावलांवर पाऊल टाकून जगणारे...
शोधून ही सापडत नाहीत...
तुम्ही समतेचा मानदंड होता....
तुम्ही न्यायाचं आभाळ होता..
तुम्ही शोषितांचे मायबाप होता...
तुमचा विचार चिरंतन...
आहे आणि चिरंतनच राहील...
कारण आम्ही 'शिवाजी'
आमच्या 'जीवाशी' जपतो...
© सागर सोनाई
शिवजन्मोत्सव
१९ फेब्रुवारी,२०१९
No comments:
Post a Comment