Thursday, 27 July 2023

गुल्या मामा

 गुल्या मामा...

माझं लहानपण येवतीला गेला...माझ्या जडणघडणीत या गावाचं खुप मोठं योगदान आहे..हे गाव म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ जणू...माझ्या आगामी पुस्तकात आठवणींमध्ये अजरामर असलेल्या अनेक जिवाभावाच्या माणसांबद्दल वाचायला मिळेल...असाच एक व्यक्ती..
माझा गुल्या मामा..
जगण्याच्या संघर्षात अनेक माणसं मातीआड गेली...काहींची भेट झाली तर काही न सांगताच अनंताच्या प्रवासाला निघून गेली...
माझा फोन वाजला ...आई पलीकडून बोलत होती....म्हणाली ,"सागर..अरे भिकू मामा वारला...! काय करू मला काय सुचेना झालंय तू असशील तसा ये...आता जाणं शक्य नाही...अंत्यसंस्कार झालेत ...."
मला फोनवर काय बोलावं क्षणभर सुचेना..
घड्याळाचे काटे उलटे फिरायला लागले..
माझ्या डोळ्यासमोर उसाच्या फडात फडकरी म्हणून राब राबणारा माझा मामा डोळ्यासमोर दिसु लागला...
यल्लपा माझा चुलत आजा...माझ्या आईचा चुलता...आम्ही सगळे बापू म्हणत असू त्याला..त्याला तीन पोरं भिका,पका आणि सखा...मंजा बाई त्याची बायको...माझी पणजी धोंडाबाई बाळ जोगती...म्हाळुंगे गावच्या लहू कांबळे यांच्यासोबत रीतसर लग्न केले होते तिने...स्वतः देवदासी असून सुद्धा कित्येक मुला मुलींना देवदासी म्हणून सोडण्यापासून परावृत्त केले...
कुणी तिच्याकडे देवदासी म्हणून पोराबाळांना सोडायचं म्हणून घेऊन आलं आणि गुरू करून घ्या म्हटलं की ती चवताळायची... म्हणायची ,"भोसड्यानु आमी वाटला लागलूय ते कमी हाय का.! तवा ह्यासनी घिऊन अलायसा ते..!"
पुढच्याची बिशाद नसायची तिच्यापुढे बोलायची...
आम्ही तिला देवाची आई म्हणत असू... तिचा बापूचा आणि गुल्या मामाचा चेहरा एकसारखा होता...मंजू आईला लेकरू होत न्हवतं म्हणून तिनं देवाला नवस बोलला होता की, भीक मागून बाळाचं नाक टोचन म्हणून....तिला पहिला मुलगा झाला म्हणून आई आणि बापूनं नाव ठेवलं भिका...
स्वभाव मुळातच लाजरा बुजरा...साधा भोळा..
जणू सांबच...!
कुणाला दुखवायच नाही...कुणाला लाही बोलायचं नाही..
शांतपणे सर्वकाही सहन करत जगायचं...! असा त्याचा स्वभाव ...
शिक्षण जेमतेच... सख्ख्या -चुलत भावंडांमध्ये मोठा असल्याने
भिकू दादा म्हणून परिचित असायचा....
माझ्या आईवर लय जीव त्याचा...आई येवतीला आली की
"आकने कवा आलीस..! " अशी प्रेमळ साद कानावर पडायची...
माझे वडील मुंबईला कामाला असल्याने काही काळ आईचं येवतीत राहणं व्हायचं...मी सर्वांच्या लाडाचा असलो तरी त्याचा विशेष जीव माझ्यावर... उसाच्या फडात ऊसतोड कामगार कोल्हापुरी भाषेत 'फडकरी' राब राब राबला...
मूल नसल्याने माझ्यावर खूप जीव होता त्याचा...फडातून घरी येताना चांगला दणकट आणि गोड ऊस आवर्जून घेऊन यायचा...
दाराजवळून 'गुल्या' म्हणून प्रेमानं हाक मारली की मी कसा असेल तसा त्याच्याकडे धावत जायचो...त्याच्या तोंडाला जर दारूचा वास आला की ..त्याची केसं धरून वडायचो...
"आलास... परत पिऊन आलास...!पिणार का परत...! "
माझ्या मामानं परत दारू पिऊ नये म्हणून माझा जीवापाड आटापिटा चालायचा...
मला लहानपणी खांद्यावर घेऊन नवरात्रात गावभर फिरवायचा...
कालांतराने तो आणि मामी दोघे गोकुळ शिरगाव ला राहायला गेले...मामाला तिथे एक कंपनीत कायमस्वरूपी काम लागलं.तिथे त्याच्या हाताच्या अंगठ्याला इजा झाली होती...
कालांतराने आमचा संपर्क तुटला...
अगदी तुटक तुटक संपर्क व्हायचा.
मामा अगदी मोजकच बोलायचा...
का माहिती नाही.
चार वर्षांपूर्वी त्याला पॅरालिसिस चा झटका आल्याचं कळलं..
उपचार केले गेले..काठीला धरून चालायचा..
मी पहिल्यांदा त्याला पाहिलं तेंव्हा खुप वाईट वाटलं...
त्याला खूप समजावून सांगितलं ....मामा हिंडत फिरत जा...
त्याने ऐकलं ही...
उपचाराला आणि पोटाला होती न्हवती ती सगळी कमाई संपली...
कोरोनाच्या काळात खूप हाल झाले...मलाही तिकडे जाता आलं नाही...
शेवटी सगळा पसारा उचलून ते दोघं गावाला आले.
सव्वा दोन महिन्यांपूर्वी मी,बायको आणि आई गावाला जाऊन त्याला बघून आलो..मधल्या काळात जशी जमेल तशी पैशांची मदत केली...
साडे पाच फुटांचा देह ..आता आकसून अंथरुणात केविलवाणा पडलेला पाहून काळजात खूप कालवाकालव झाली...खूप रडला माझ्यापाशी...त्याची अवस्था पाहून मी माझ्या भावना खूप दाबून टाकल्या...आवंढा गळ्यातच गिळून टाकला..हतबल असलेला मी...माझ्या हतबलतेला मनातल्या मनात शिव्या दिल्या... सख्खे सुद्धा अशावेळी परके होताना पाहिले मी...
क्षणाक्षणाला मृत्यूकडे जाताना पाहिलं मी त्याला...
आणि त्याच्या मरणाची वाट पाहणाऱ्या नतद्रष्ट नजराही..
त्याच्या तोंडात माझं आणि आईचं नाव शेवटपर्यंत होतं...
तो मरून 'सर्गी सोन्याचा' झाला...की जगायची इच्छा असूनही
त्याला जगता आलं नाही याची खंत मनाला आयुष्यभर खात राहील...काल आईनं तो गेल्याचं सांगितलं....भरल्या डोळ्यांच्या धूसर पडद्याआड खाकी शर्ट घातलेला...तोंडावर हसू असलेला ...हातात उसतोडणीचा विळा घेऊन निघण्याच्या तयारीत असलेला त्याचा चेहरा दिसत होता...
©प्रा.सागर कांबळे
No photo description available.



A

 जय जय जय भीम....!!!!

जय भीम ....नुसताच नारा नाही...
जय भीम ...जिथे असत्याला थारा नाही..
जय भीम...शोषितांचा एल्गार आहे..
जय भीम...दंभावरती वार आहे...
जय भीम...स्वातंत्र्याची आस आहे...
जय भीम...मानवतेचा श्वास आहे...
जय भीम... समतेचे युद्ध आहे...
जय भीम...या मातीत रुजलेला बुद्ध आहे...
जय भीम...सत्याचे दुसरे नाव आहे...
जय भीम... भगिनी बंधुभाव आहे...
जय भीम...न्यायाचा हुंकार आहे...
जय भीम...अन्यायावरती प्रहार आहे...
जय भीम...स्वाभिमान आहे...
जय भीम...सन्मान आहे...
जय भीम...अंधाराकडून प्रकाशाकडे जाणं...
जय भीम...मानवमुक्तीचं गाणं...
जय भीम...!!!
-प्रा.सागर मा.कांबळे करवीर

 बाबा....

हजारो वर्षांची गुलामीची बंधनं तोडून ....
या मातीची कूस उजवली तेव्हा....
तुझ्या आभाळाएव्हढ्या हातांनी
तूच तिचं बाळंतपण केलंस....
आणि अलगद पेललंस...
नवजात भारताला....
त्याच्या प्राक्तनाची गाथा लिहिताना
तुझ्या शरीरातला रक्ताचा थेंब आणि थेंब आटवलास...
तुझ्या सूर्य पेरणाऱ्या दृष्टीनं.... पुढची हजार वर्षे
अगोदरच पाहून ठेवली होती कदाचित....
म्हणून जगाच्या रहाट गाडग्याचा हिशोब करून...
तू दावलीस...
त्याच्या उज्ज्वल भविष्याची दिशा...
तुझ्या हातांनी लिहिलेलं आमचं प्रारब्ध
आता कुठे आकार घेऊ लागलं होतं...
पण बाबा...
आमच्या वाटेवरचे निखारे अजून संपलेले नाहीत...
तू नसतास तर या देशाची लोकशाही...
टाचा घासून कधीच मेली असती....
आणि माजली असती अराजकता ठायी ठायी....
पण तू बांधून टाकलंस...
या देशाला एकात्मतेच्या सूत्रांत...
तुझ्यामुळंच हा देश ' देश ' आहे नाहीतर कधीच बनला असता...
काटेरी वाळवंट....
बाबा एवढं सगळं मुक्तहस्ताने दान केलंस...
पण लोकशाहीच्या या उत्सवात...
'
आम्ही भारताचे लोक'
तुलाच गायब करून टाकतो...
तुलाच गायब करून टाकतो....
सागर सोनाई...

 प्रिय शक्ति...

पाहिलं काल तुझं चित्र...
तुझ्या डोळ्यातली अगतिकता...
तुझे हात करकच्चून बांधलेले...
मान आणि मन झुकलेले होते जमिनीच्या गर्भाकडे...
सुटायचा प्रयत्न करताना , तुझ्या चेहऱ्यावर उठणारी वेदनेची लकेर स्पष्ट दिसत होती...
तुझा अगतिक चेहरा, तुला होणाऱ्या अमाप आणि असह्य वेदनांची साक्ष देत होता...
वरून तुझ्या असह्यतेवर फिदीफिदी हसणारी पुरूषप्रधानता तुला...
एक बाजूला तुला शृंगाराच्या, सौंदर्याच्या आणि स्त्रीत्वाच्या तथाकथित मानसिक बेडयांनी जखडून ठेवताना पाहिली ....
तर दुसरीकडे त्याच बेडयांना संस्करांचा सोन्याचा मुलामा
लावून मिरवताना मी तुला पाहिलं...
तुझ्या भाळावरच्या भल्या मोठ्या कुंकवाला ही तुझ्या पायातल्या...
साकळणून...सुकलेल्या रक्ताचीच लाली आली होती...
प्रिय शक्ति...
तू ठरव अगोदर, तुला कुणाशी लढायचंय...
पुरुषांशी, पुरुषप्रधान - पितृसत्ताक व्यवस्थेशी की...
तुझ्यातल्याच 'शरण जाऊन हसत हसत रूढी परंपरांच्या जुवाचं मरण खांद्यावर घेणाऱ्या' गुलाम स्त्रीत्वाशी....
सर्वच पुरुषांना एका लायनीत नको ग उभा करुस...
नाहीत जोखता येत सर्वजण एकाच मापानं...
विश्वास ठेव या देशात पुरुषप्रधान - पितृसत्ताक व्यवस्थेच्या बुडाखाली आग लावणारा एक पुरुषच होता...
तू विश्वास तर ठेव त्या महान क्रांतीसूर्याचा प्रकाश आपल्या मन, मेंदू आणि मनगटात साठवून तुझ्या सोबत उभा राहायला
नव्या युगाचा जोतिबा तयार आहे...
तोच उलथवून लावील ही पुरुषप्रधान - पितृसत्ताक व्यवस्था...
आणि आणील समतेचं राज्य...
पण त्याला तुझ्या खंबीर आणि निडर साथीची गरज आहे...
कारण तो तुझ्याशिवाय अपूर्ण आहे....
प्रिय शक्ति...
तू अशी थकून , हरून बसलेली ...मला अजिबात आवडणार नाही....
तुला एल्गार करावाच लागेल....युद्ध पुकारावंच लागेल... त्याची सुरुवात मात्र तुझ्या स्वतःच्या धारणांशी लढण्यापासूनच करावी लागेल...
बाकी तुझ्या डोक्यावरची उन्हं पेलायला मी सोबतीला आहेच...

 कोल्हापुरी माणूस तसा दिसायला रांगडा....काळाभोर, तुकतुकीत...जुनं खोंड असेल तर त्याचा रुबाब काही वेगळाच...डोक्याला भरगच्च कोल्हापुरी फेटा..अंगात पैरण,धोतर,पायात करकर वाजणारी कोल्हापुरी कापशी पायताण...कधी कधी खांद्यावर विजार टाकून ती पाहुण्यांच्या गावाच्या वेशीवर गेल्यावर घालून आत प्रवेश करणारी माणसं ...हातात पानाची पिशवी...त्याला लोम्बणारी पितळी चुन्याची डबी...आणि त्या लाखमोलाच्या दौलतीची राखण करणारा पोलादी अडकिता ...चालतानाचा रुबाब तर राजेशाहीच...पिंड लाल मातीत रापुन तयार झालेला...कुस्तीच्या आखाड्यात खुद्द खविसाला ही माती चारणारा...पिशवीत येणारं दूध सहसा मान्य नाहीच...कोल्हापुरात पहिल्या पहिल्या धारोष्ण दुधाची चवच निराळी...तोंडातली शिवी म्हणजे मित्रावरच प्रेम आणि शत्रूला दिलेली खुन्नस...

कोल्हापूरी माणूस जसा तशीच कोल्हापूरच्या मातीत जन्माला येणारी बाईमाणुस ही...हमखास रंग गोरा किंवा सावळा घेऊन जन्माला येणार...कपाळावर गोंदण, नाकात नथ, चेपून नेसलेली मराठा नऊवारी, पायात कोल्हापुरी चेपल्या,कमरेला कमरपट्टा...बोलण्यात सो कॉल्ड नाजूकपणा नाहीच... 'आलो,'गेलो',असे स्व आदरार्थी संबोधन नेहमी वापरणारी...
लग्ना वऱ्हाडात हमखास दांडपट्टा आणि लाठीकाठीचं प्रात्यक्षिक बघायला मिळणार...शिवजयंती आणि दसरा हा तर जिवाभावाचा उत्सव
राजर्षि शाहू राजांच्या थोर पुण्याईने सदैव हिरवागार असणारा हा परिसर...रंकाळ्यावर घालवलेले संध्याकाळचे रम्य क्षण...अंबाबाईच्या मंदिरात देव मानत नसतानाही घालवलेले क्षण आणि तिथले अनुभवलेलं सांस्कृतिक वैभव...
इथल्या चौकाचौकात 'भावा' अशी मारली जाणारी प्रेमळ हाक....
बिंदू चौकातली विशाल सभा...पापाच्या तिकटीचं कोल्हापुरी चप्पल मार्केट..त्यालाच लागून असणारा शिवाजी पुतळा...तिथून पुढे सरकत गेलं की येणार गंगावेश ...सरळ जावं तर थेट रंकाळा...आणि उजवीकडे वळून शिवाजी पुलाकडे वळावं तर शुक्रवार पेठेतून सरळ पंचगंगा नदीच्या ऐतिहासिक घाटाकडे ओढत घेऊन जाणारा रस्ता...आणि लागीर झाल्यागत जिथं हा रस्ता संपवा तिथे पंचगंगा माईनं हसत केलेलं स्वागत... जुना आणि नवा राजवाडा म्हणजे कोल्हापूरचं वैभव...आणि महालक्ष्मी मंदिर ही...
शिवाजी पेठेत किंवा शहराच्या मध्यवर्ती भागात फिरत असताना..
'काटाकिर्रर्र खटक्याव बॉट जाग्याव पलटी'
संयुक्त गडगडाट मित्र मंडळ,
थाम्ब टकल्या भांग पाडतो,
नाद्या बाद...
आबा कावतुय..
लेट्स चिंगळी..
अस्स करतीयस व्हय...!
असे मराठी भाषेला अगदी न समजण्याइतके सहज मात्र भाषिक मूल्य असणारे रांगडे शब्द...
ग्रामीण भागात असणारी भात शेती...
लागण, खोडवा, निडवा अशी उसाची शेती...
तितक्याच गोडीची गुऱ्हाळं... गूळ ,काकवी,यांचं उत्पादन...
निसर्गाचं तर काय वर्णन करावं...
आपल्या कुंचल्यानं एखाद्या प्रथितयश चित्रकाराने चित्रं रेखाटावी तश्शीच ही ....भाताच्या खाचरातून वाहणाऱ्या लहान लहान झऱ्यानी पुढे जाऊन मोठ्या धबधब्याच्या आकारात जन्म घ्यावा ....पावसाच्या कधी अल्लड तर कधीकधी मुसळधार सरींनी मातीची चापून यथेच्छ धुलाई करावी आणि जमिनीनंही तिला आपल्या अंगाखांद्यावर हसत हसत खेळवाव....मधूनच त्या हिरव्यागार भरजरी शालूवरती सोनेरी धाग्यांनी भरतकाम करावं तशीच भासणारी गाडीवाटेची वळणदार नक्षी....
गारठून गेलेल्या वातावरणात मायेची ऊब देणारी कौलारू घरं... आणि त्यांच्या कडे ओढत घेवून जाणाऱ्या पायवाटा...गावात शिरताच वयस्कर मनांनी हसत केलेलं स्वागत..
गारगोटीला जाताना पूर्वी वडाच्या झाडांच्या बोगद्यातून जावं लागायचं...तो हवेचा थंडावा....आज एसी मध्ये बसून पण मिळत नाही...माणूस पण किती क्रूर बघा... ज्या झाडांनी माणसांच्या डोईवर सावली धरली...त्याच झाडांच्या कुशीत त्याने आग लावली...आणि ती झाडं हळूहळू संपवून टाकली...कुणी संपवली हा प्रश्न अजूनही निरुत्तर आहे...मात्र सावली देणाऱ्या झाडांची झालेली ही अवस्था पाहून जुना कोल्हापुरी माणूस हळहळतो... राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या आठवणींचे हे साक्षीदार आता तिथे नाहीत तेंव्हा होणारी मनाची तळमळ शब्दात व्यक्त नाही करता येत.
आता शहर आधुनिकीकरणा कडे झुकलंय...कोल्हापूर च्या आसपासची वीस किलोमीटर च्या परिघातली गाव आता शहरं व्हायच्या प्रक्रियेत आपलं गावपण कधीच विसरून गेली आहेत...गाडीवाटा आता दिसत नाहीत ...दिल्लीतलं , मुंबईतलं राजकारण आता गल्ली गल्ली पर्यंत पोचलय ....गावातल्या तालमी आता कधीच ओस पडल्या आहेत..तिथली लाल माती गप गुमान पडून राहते आखाड्यात...गावाकडची जुनी खोंड केंव्हाचीच या जगातून निघून गेली आहेत...आणि ज्यांना स्वतःच्या तरुण असण्यावर वारेमाप माज होता ते मात्र आता ...वार्धक्याच्या ओझ्यानं झुकलेले दिसून येतात...काल परवापर्यंत बाचणीचा येसुमामा त्याच्या सायकलवर वर्क्या, बटर घेऊन यायचा, आता त्याच्या जागा मारवाड्यांच्या स्वीट होमनी घेतलीय.. संभाजीनगर मधून निघणारी एसटी आजकाल सीबीएस वरून सुटते ..संभाजी नगरचं स्टॅड मात्र वृद्धाश्रमातल्या आई बापानी आपल्या पोटच्या पोरांची वाट पाहावी तसं प्रवाश्यांची वाट पाहत एकटंच बसून असतं...सोबतीला कर्नाटक महामंडळाच्या एक दोन बसेस असतात त्याच्या...
रस्ते सिमेंटचे झालेत मात्र तो इथल्या हिरवाईचा घास घेऊनच...कधी काळी कोल्हापुरातून महाराष्ट्राची सूत्र हालायची...आता महाराष्ट्रातून कोल्हापूरची सूत्रं हलतात.ज्या चित्र नगरीमध्ये मराठी चित्रपट सृष्टीने सुवर्णकाळ पाहिला ती चित्रनगरी आज ओस पडल्यासारखी भासते..रंकाळा मात्र आपलं वैभव टिकवून आहे... गंगावेश , पापाची तिकटी, महानगर पालिका,शाहूपुरी ,लक्ष्मीपुरी इथली मोजकीच दुकानं काय त्या जुन्या खुणा जपून आहेत...दसरा चौक दसरा सोडला तर कधीच गजबजलेला नसतो...बिंदू चौकात ही फुले –आंबेडकर शांतपणे उभे आहेत...कावळा नाक्याचा रणरागिणी ताराऊसाहेब आणि दसरा चौकातला राजर्षी शाहू छत्रपतीं महाराज यांचे पुतळे आपल्या रयतेवर मायेची पाखर घालत उन्हा पावसात उभे आहेत...कोल्हापूर वेगानं विस्तारतंय...खरंच कोल्हापूर बदलतंय....
सागर सोनाई

 प्रियदर्शी अशोक ...

तुला काय बोलू....आणि तुझ्याबद्दल किती बोलू...
तुला जनतेने प्राणप्रिय म्हणून दिलेल्या पदव्या वाचताना....
धाप लागते मला...जशी बुद्धाची हजारो नाव ...आणि बाबासाहेबांच्या पदव्या वाचताना लागते ...तशी...!
तू ...होय...तूच...
तुझ्या नावापुढे ...पोकळ आदरार्थी अनेकवचने लावून ...
तुझं माझं नातं मला परकं करावंसं अजिबात वाटत नाही बघ...
मी सह्याद्रीच्या कठीण कातळांना रानवारा पिऊन ....
भेटत असतो....तेंव्हा माझ्या खांद्यावर हात टाकून तूच माझ्याबरोबर चढत असतोस....पायवाटा मानवमुक्तीच्या...
तू कोरलेल्या हजारो लेण्या साक्ष देत राहतात.. तुझ्या कारुण्यमूर्ती व्यक्तीमत्त्वाची... आणि विशाल हृदयी काळजाची...
खरंतर या विश्वाचा सात बारा तुझ्या नावाचा आहे...
तुला 'महान' या आदरार्थी संबोधना शिवाय...संबोधनच सुचत नाही बघ
तुझ्याच परंपरेला पुढे... सातवाहन राजांनी पुढे नेलं...
आणि नंतर तोच वारसा...बोधिसत्व बाबासाहेबानी...
हे प्रियदर्शी सम्राटा... विश्वविजेत्या...
जेंव्हा जेंव्हा मी स्वतःच्या सावलीला बघून हतबल होऊन जातो...आणि या विश्वात माझी किंमत किड्या मुंगीची आहे याची जाणीव मला होत जाते...जेंव्हा जेंव्हा माझं मन पार गांगरून जातं..
तेंव्हा तेंव्हा...तुझ्याकडे पाहिलं की वाटत राहतं...
आपण कोण्या येरागबाळ्याचे वारस नाही आहोत...
तो वारसा व्हाया बाबासाहेब आजही...मेंदूच्या नसा नसांमधून वावरतोय... मग नैराश्याच्या विचारांना अलगद धोबी पछाड देऊन आस्मान दाखवतो मी... कारण तुझ्या नावातच अ-शोक आहे.तुझी तुलना फक्त तुझ्याशीच होऊ शकते...
अन्य कुणाशीच नाही...
तुला तुझ्या जन्मदिनाच्या....कोटी कोटी शुभेच्छा...
©प्रा.सागर कांबळे करवीर

 आनंदाचं गाव येवती..

आनंदाचं गाव येवती..
काळजात कोरलेलं नाव येवती...
कित्येक वर्षे जपलेला...
भगिनी बंधू भाव येवती...
महादबा मिस्त्रीची धाव येवती...
उद्यमनगराचा जीव येवती...
कोल्हापूरची गुजरी येवती...
सोन्याहूनही साजरी येवती...
महादेवाची पिंड येवती..
खिलार नंदीचं वशिंड येवती...
अंबाबाईची माया येवती...
माणुसकीची छाया येवती...
सीमेवरचा सैनिक येवती...
रत्नांमधलं माणिक येवती...
सैनिकांच्या आठवणींचा पीळ येवती...
वडाचा माळ आणि खडीच्या वनकुरणातली शीळ येवती..
गोकुळचं दूध येवती...
मसुदीतला उद येवती...
पिराचा संदिल येवती..
शिवबाचा मंदिल येवती...
शिवरातली हाक येवती...
करवीर तालुक्याचं नाक येवती...
शिवरायांचा विचार येवती...
शाहू राजांचा जयजयकार येवती...
झान्जांची झाल येवती...
ढोलाचा ताल येवती...
मर्दानी खेळ येवती...
दुधा इतकीच निर्भेळ येवती..
कुस्तीची परंपरा येवती..
सपत्यातला गोळमाट गरा येवती...
शंभर वर्षांची शाळा येवती....
अनमोल सुवर्ण माळा येवती...
पचमी तला फेर येवती...
गौरी तला माहेरवाशीणींचा घेर येवती...
कोल्हापूर ची शान येवती...
आमचा अभिमान ...प्राण येवती...
प्रा.सागर मा.कांबळे...

 अभिनयाच्या 'लेणी'तील 'यक्ष' 'कुळंबीण'...

दिपाली बडेकर...
पुण्यात महाज्योति या शासकीय संस्थेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या 'तृतीय रत्न' या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग पाहण्याची संधी मिळाली... ज्या पुण्यात जोतीरावांनी या नाटकाची निर्मिती केली ...त्याचा नाटकाचा प्रथम प्रयोग पाहण्याची संधी मिळाली...कृतकृत्य झाल्याची भावना मनात निर्माण झाली.. या निमित्ताने अनिरुद्ध वनकरांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वातील दिग्दर्शन या गुणाचा परिचय झाला.... या नाटकाला काळजात उतरवून घ्यावे इतकी मेहनत यावर अनिरुद्ध नी केली आहे...पदोपदी त्यांची मेहनत आपल्याला हे नाटक पाहताना दिसून येते...
प्रस्थापित अभिनय वर्तुळातील तेच तेच चेहरे न घेता संपूर्ण महाराष्ट्रात फिरून त्यांनी कलाकारांची निवड केली आहे...आणि कलाकारांनीही आपला जीव ओतून त्या व्यक्तिरेखा जिवंत केल्यात... दस्तुरखुद्द जोतीरावांच्या काळात हे नाटक रंगभूमीवर येऊ शकले नाही मात्र जवळपास दीडशे वर्षानंतर ते रंगभूमीवर आले...किती हा मोठा विरोधाभास...!
यातली कुळंबीन साकारणाऱ्या दीपाली बडेकर ने तर अक्षरशः त्या रंगभूमीवर राज्य केले... तिच्या सर्वांगसुंदर अभिनयाने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले...
दीपा... एक गुणी अभिनेत्री...! तिने आजवर राणी मुखर्जी, अमीर खान यांच्यासारख्या दिगग्ज व्यक्तींसोबतअगदी लिलया ती अभिनेत्री म्हणून वावरली... फेसबुकवर तृतीय रत्न नाटकाची जाहिरात पाहिली आणि त्यात दीपाली बडेकर हे नाव मला दिसले तेंव्हा तिचा अभिनय पाहण्याची संधी आयतीच चालून आली...
सुरुवातच तिच्या प्रवेशाची...१५० वर्षांपूर्वीची कुळंबीन तिने अगदी हुबेहूब साकारली... तिच्या वेदना,देवभोळेपणा, पोटातल्या बाळविषयची अतीव काळजी...नवऱ्याच्या पाठीशी उभी राहणारी स्त्री आणि या भिक्षुकशाहीच्या खोटेपणाचा बुरखा टराटरा फाडणारी कुळंबीन काही केल्या नजरेसमोर जात नाही...खरतर या नाटकात सर्वच कलाकारांनी उत्कृष्ट काम केले आहे तरीही या नाटकाची जान म्हणाल तर विदूषक,कुळंबीन,जोशी आणि दिग्दर्शक अनिरुद्ध वनकर होते...
दीपाने सौन्दर्याच्या रूढ समजुतींना फाट्यावर मारून स्वतःच्या अभिनयाच्या सौंदर्याने लाखो मनं जिंकून घेतली आहेत... मराठी चित्रपट सृष्टीत जात,वशिला, बापकमाई अशा मार्गाने आलेल्या अभिनेत्रींना आम्ही सहन करतो मात्र दीपाचा अभिनय पाहिला की अभिनयातल्या गुणवत्तेची स्मिता पाटील या गुणी अभिनेत्री च्या जवळपास जाणारी व्यक्तिरेखा दीपाची आहे... तिचे डोळे खूप बोलके आहेत... केरळातील अस्पृश्य समाजातल्या महिलांना स्वतःचे स्तन झाकण्याचा कर द्यावा लागत असे.. अशावेळी केरळात नागेली नावाची चळवळ उभी राहिली आणि त्यातून स्त्रियांना स्तन झाकण्याचा अधिकार मिळाला...त्यावर आधारित नागेली या नाटकात दीपाची स्वतंत्र अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण झाली... तिचा अभिनय पाहायचा असेल तर तिच्या डोळ्यातून तो ओसंडून वाहत असतो...सलाम आहे तिला..तिच्या अभिनयाला...!
या यक्ष कुळंबीनीचा विश्वाकर्मा आहेत आमच्या माई ,बापू आणि किशोरदा... किशोरदाचा परिसस्पर्श लाभला आणि अनेक लेकरांच्या आयुष्याला वाट सापडली...ग्रेट समाजशिक्षक आहे किशोरदा....! माई आणि बापू म्हणजे जगणं शिकवणारी आभाळाएव्हढी माणसं... लेक झाली म्हणून गर्भातच तिचा गळा घोटणारे आईबाप आपण पाहिले असतील मात्र मुलींच्या जन्माचे स्वागत करून त्यांना घडवणारे सूर्यकांत बडेकर बापू अवलिया व्यक्तिमत्त्व आणि संवेदनशील कवीही...! चार ही लेकी चार दिशांना भारताची गौरव गाथा सांगणारी राजमुद्रा बनून उभ्या आहेत...
अखेर एवढंच सांगेन...दीपा अभिनयाच्या लेणीत कोरलेली यक्ष कुळंबीन दिसते मला....
दीपा तुझ्या रूपाने मराठी रंग आणि चित्रपट सृष्टीचा वनवास संपून नक्कीच चांगले आणि दर्जेदार पाहायला मिळेल याबाबत ठाम विश्वास वाटतो..
जय भीम ...जय भारत...

 प्रिय मार्क्स,

खूप बरं वाटलं तुझं...बुद्ध हातात घेतलेलं चित्र पाहून...
जगातल्या तमाम शोषितांच्या वेदनेला विद्रोहाचे टोकदार भाले बनवून....
समस्त शोषकांच्या थेट काळजात ते रुतवून... उगवणाऱ्या लाखो सुर्यांना मानवतेची दीक्षा दिलीत तुम्ही...
म्हणून तर लाखो शोषितांच्या जिभेवर तुमचा जयजयकार उगाच नसतो...!
तुम्हा दोघांच्या वाट्याला सगळ्यात जास्त द्वेष आला रे...
हिटलर ही तुझा द्वेष करायचाच की....
पण बुद्धाला मात्र अडीच हजार वर्षांपासून पंडितांच्या द्वेषाला सामोरं जावं लागतंय...
तुझ्यापेक्षा जरा जास्तच...
एकजण त्याला प्रच्छन्न करायला निघाला होता....
मात्र स्वतःच छिन्नविच्छिन्न होऊन मातीत मिसळून गेला...
मार्क्स...
ज्या झाडाखाली त्याला बोधी प्राप्त झाली ते झाड सुद्धा इथल्या लोकांनी मुळासकट उपटून टाकलं...केवढा हा द्वेष...
पण या मातीतला बुद्ध मात्र ते उपटू नाही शकले...
कारण...
बुद्धाची मुळं भारतीयांच्या शरीरात धमन्या बनून आहेत...भारतात जे ज्ञान,संस्कृती,शील,विद्वत्ता आहे ना त्याचा शास्ता बुद्धच आहे...
प्रिय मार्क्स...
तू मांडलेला साम्यवाद त्याने तुझ्या आधी तेवीसशे वर्षे सत्यात उतरवला होता रे...फरक इतकाच होता...
तुझा साम्यवाद रक्तरंजित क्रांतीची भाषा करतो तर...त्याचा साम्यवाद रक्तविरहीत क्रांतीची...
पाण्यासाठीही त्याने रक्त सांडू दिलं नव्हतं...
तू म्हणतोस धर्म अफूची गोळी आहे....
इथं तुम्हा दोघात साम्य आहे बघ...त्यानेही धर्म नाकारून धम्माची दीक्षा तमाम मानवजातीला दिली....
धर्मापेक्षा धम्म नावाचा जीवन जगण्याचा सम्यक जीवन मार्ग दिला बघ....
प्रिय मार्क्स...
तू खरंच बुद्धाला भेटायला हवं होतंस...
तुही मुंडन करून चिवर धारण केलं असतं...
कदाचित त्याचा रंगही लालच असता....
No photo description available.

All reactio

 बाबासाहेब बॅरिस्टर होऊन लंडनहून भारतात परत येताच त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची गर्दी बंदरावर झाली.लक्ष्मी बाई म्हणाल्या "अगं रमा आवर लवकर साहेब पोचले पण असतील" रमाई qट्रंक मध्ये काहीतरी शोधत होती. शेवटी त्या लक्षमीबाईना म्हणाल्या ,"ताई, तुम्ही पुढे चला मी आलेच," सर्वांची नजर फक्त बाबासाहेबांवर होती तर बाबांची नजर रमाईच्या वाटेवर होती.थोड्या वेळाने त्यांना दुरून येताना रमाई दिसली - बाबासाहेबांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं, रमाई गर्दीत सर्वांच्या मागे उभी होती.रमाई ट्रंक मध्ये साहेबांच्या सत्कार समारंभाला जाण्यासाठी नेटकं लुगडं शोधात होती.पण फाटक्या संसाराची ठिगळं जोडताना तिच्या लुगड्यांनाही तितकीच ठिगळं होती.शेवटी रमाई जे हाताला लागलं ते नेसून साहेबांच्या सत्कार समारंभाला आली. ते म्हणजे कोल्हापूरच्या छ.शाहू महाराजांनी बाबासाहेबाना दिलेला मानाचा शेला होता. आणि हे फक्त दोनच व्यक्तींना माहिती होत एक रमाई आणि बाबासाहेब.दोघांच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले...ते दृश्य पाहून क्षणभर बंदरावरचा अल्लड वारा गहिवरला आणि समोरच्या सागराने आपल्या निळाशार शेल्याने डोळे पुसले...

 पहिला पाऊस झाला की रानातली लगबग सुरू व्हायची...

रानं करायला घायचा आमचा मामा..आम्ही घरची मंडळी रानातली काम करायला जायचो...अंगावर टपोरे थेंब झेलत, बांधाच्या बाजून टिकाव,कुदळ घाव घालत,बांधाला कड मारायचो, किंवा हातात खोरं घेऊन गुढघाभर चिखलात चिखल घुट्टा मग भात लावणं...!
पाऊस वाढला की मग घराकडे यावं लागायचं...मस्त गरम पाण्याने अंघोळ करून ,गरम कपडे घालून गोधडीत शिरायचं...त्यावेळी शेणाने सारवलेली जमीन अजूनच ऊब द्यायची...
याच दिवसात गावाकडं बेंदराची लगबग असायची...सजवलेल्या बैलजोड्या अजून उठून दिसायच्या, आम्ही चिखलाच्या बैलजोड्या पूजयचो... लव्हाळ्याच्या शेंड्या तोडून त्याची ही पूजा व्हायची..पिंपळाच्या पानांचं दारावरचं तोरण अजून ही नजरेसमोरून जात नाही...माझ्या आईच्या(आजीच्या) हातच्या पुरण पोळी आणि येळवणी ची आमटीला कशाची ही सर नाही यायची...
आज ते दिवस आठवतात, आईची आठवण येते...आज आई नाही...घर मोकळं वाटतं...रानही तशीच पोरकी...

गुल्या मामा

  गुल्या मामा... माझं लहानपण येवतीला गेला...माझ्या जडणघडणीत या गावाचं खुप मोठं योगदान आहे..हे गाव म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ जणू...माझ्या ...